बाप संतसभा भली | बहु
1491.
बाप संतसभा भली | बहुता पुण्ये जोडिली |हृदयींची गोवी आपुली | संताप्रति निवेदीन ॥१॥
आजि प्रसंग हरिभक्तीचा | हरि स्वभावे उच्चार वाचा |विठोबा ऋणिया रे भक्तांचा | ऋण फेडितो भक्तांचे ॥२॥
अरे हा अनादिचा लागु करी | अरे जन्माची उभरा भरी |आमुचा लागिया श्रीहरी | दो उत्तरी निवडावा ॥३॥
आता असो हा कर्मविभागु | आम्ही मागू आपुला लागू |जरि हा म्हणेल निःसंगु | तयासी आम्हांसी संबंध कायसा ॥४॥
जरि हा न लगे आमुचे ऋण | हाती घेऊनि सुदर्शन |आम्ही करू हरिकीर्तन | तेथे तिष्ठत का उभा ॥५॥
मागे चाळविलि या रिति | परि आम्हांसि आलिया प्रचीति |ज्यासि हरिची सोय संगती | तयासि न मने अन्य स्थळ ॥६॥
हरि कौसाळ मल्ल म्हणती | ते अवघी रे जाणावी भ्रांति |सेवा हरिची सांगताती | संत होती हरिकडे ॥७॥
आणि एकू आम्हांसी आठवले | आम्ही भांडूकरे एकले |आमुचे केले काय चाले | या हरिभक्ता वांचूनि ॥८॥
जे हरिभक्ति विरहित | त्यांचे हरिचरणी न बोधे चित्त |अवघ मिळूनि हरिचे भक्त | हरि व्हावा म्हणताती ॥९॥
आणिक एक नवल परि| जो याची सेवा करी |त्याचे सर्वस्व हरी | आणि श्रीहरि नाम मिरवतु ॥१०॥
हरि आळविता मागा उभा | आठविता पुढे उभा |हरि ध्याता हृदयी उभा | हे तंत्र सभा विचारा ॥११॥
आमुचे होतेंच तुम्ही विनवावे | आम्हांसि मानले आघवे |किती येरझारी शिणवावे | शरण रिघावे श्रीहरी ॥१२॥
विश्व श्रीहरिचे आघवे | म्या गान्हाणे कवणाशी द्यावे |लागे त्यासिच मागावे | हरिविण ठावो नसे वो ॥१३॥
वीरराया पंढरीनाथा | आता अपंगावे शरणागता |जरी उपेक्षिसी सर्वथा | वाट कोणाची पहावी ॥१४॥
नको नको निंदा स्तुति| हाचि भावो हेचि भक्ति |मज नेदी पुनरावृत्ति | विष्णुदास म्हणे नामा ॥ | १५ ॥
