निवृत्ति मुक्ताईचे
1162.
निवृत्ति मुक्ताईचे वोसंडले नयन | करितो समाधान पांडुरंग ॥१॥
विसोबा खेचराचे भरोनि येती डोळे | परिसा तळमळे पुंडलिक ॥२॥
नाना खेद करूनि सारिले भोजना | जाती आचमना गंगेलागी ॥३॥
आंचंबले देव बैष्णव ते ऋषी | जाती समाधीसी चांगदेव ॥४॥
जेवूनिया संत बसले निवाडे | गोंदा महादा विडे वांटिताती ॥५॥
नामा म्हणे सवे उठे नारायण | आले अवघेजण समाधीपाशी ॥६॥
