गुणाची आवडी वाचेचा प
3283.
गुणाची आवडी वाचेचा पसरू । पडिला विसरू सर्वरसा ॥१॥
आदि मध्य अंती नाही अवसान । जीवानी जीवन मिळोनी गेले ॥धृ॥
रामकृष्ण नाममाळा हे साजिरी । ओविली गोजिरी कंठाजोगी ॥२॥
तुका म्हणे तनु झालीसे शीतळ । अवघी सकळ ब्रम्हानंदे ॥३॥
अर्थ :
मला हरीच्या गुणाची आवड लागली आहे व त्याचेच मी सर्वत्र वर्णन करत प्रसार करीत आहे व त्या छंदामध्ये मला सर्व विषांचा विसर पडला आहे. हरीचे वर्णन करण्यासाठी आता आदी मध्य अंत राहीलेलाच नाही अखंड हरीचे वर्णन चालू आहे आणि शिवरुपी जीवनामध्ये माझा जीवरुपी जीवन मिळून गेले आहे. म्हणजे जीव शिव ऐक्य झाले आहे. रामकृष्ण ही नामावळी मी माझ्या कंठामध्ये अतिशय शोभून दिसेल अशी ओवून ठेवली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, माझे सर्वांग ब्रम्हानंदाने शीतळ झाले आहे.
