ब्रम्हज्ञान भरोवरी ।
2726.
ब्रम्हज्ञान भरोवरी । सांगे आपण न करी ॥१॥
थू थू त्याच्या तोंडावरी । व्यर्थ शिणवीली वैखरी ॥धृपद॥
कथा करी वरीवरी । प्रेम नसेचि अंतरी ॥२॥
तुका म्हणे कवित्व करी । मान लोभ हे अंतरी ॥३॥
अर्थ :
एखादा मनुष्य ब्रम्हज्ञान सांगत असेल आणि त्याप्रमाणे तोच वागत नसेल तर, त्याच्यावर थु असो कारण ब्रम्हज्ञान सांगून त्याने आपल्या वाणीला व्यर्थ क्षीणच म्हणजे त्रास दिला आहे. तो मनुष्य वर वर मोठया सोंगा ढोंगाने भारी कथा करतो परंतू त्याच्या अंत:करणात प्रेमच नसते. तुकाराम महाराज म्हणतात, तो मनुष्य वर वर कवित्व तर करतो परंतू अंत:करणात आपल्याला जनमाणसामध्ये मानसन्मान धन मिळावे हा त्याच्या मनामध्ये लोभ असतो.
