निरंजना गाई चारु गेल
949.
निरंजना गाई चारु गेलो ।
तव चवाळे तेथे एक पावलो ॥१॥
मज निर्गुणे आड वारिले ।
चवाळे हिरोनि जिणे बुडविले ॥२॥
बापरखुमादेविवरे इतुके केले ।
माझे चवाळे हिरोनि नेले गे माय ॥३॥
अर्थ :
निरंजन परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी इंद्रियेरूपी गाय चारू गेलो असता तेथे एक निर्गुण घोंगडे प्राप्त झाले. त्याच स्थितीत निर्गुण घोंगडे घेण्यासहि म्हणजे निर्गुणभाव परत करण्यासहि प्रतिबंध होऊन निर्गुणभावाचे घोंगडे हिरून घेतले म्हणजे निर्गुणभावहि काढून टाकला. आणि माझे जीवित्व बुडविले. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल यांनी माझे घोंगडे हिसकवुन घेतले. एवढे काम केले. असे माऊली सांगतात.
