जन्माचे कारण रामनाम
729.
जन्माचे कारण रामनाम पाठे | जाईजे वैकुंठे एक हेळा ॥१॥
रामनाम ऐसा जिव्हे उमटे ठसा | तो उद्धरेल अपैसा इहलोकी ॥२॥
दो अक्षरी राम हा जप परम | नलगे तुज नेम नाना पंथ ॥३॥
नामा म्हणे पवित्र श्रीरामाचे चरित्र | उद्धरसि गोत्र पूर्वजांसी ॥४॥
