वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 38. शुद्ध पंचरत्न हरीपाठ › 1. पाच संतांचे हरिपाठ › 1. 5 संतांचे हरिपाठ › 5. संत नामदेव हरिपाठ

श्री नामदेव महाराज ह

🙏 38. शुद्ध पंचरत्न हरीपाठ · ABH-081480 · अभंग क्र. १

1.
श्री नामदेव महाराज हरिपाठ

नामाचा महिमा कोण करी सीमा । जपावे श्रीरामा एका भावे ॥१॥
न लगती स्तोत्रें नाना मंत्रे यंत्रे । वर्णिजे बा वक्‍त्रें श्रीरामनाम ॥२॥
अनंत पुण्यराशी घडे ज्या प्राण्यासी । तरीच मुखासी नाम येत ॥३॥
नामा म्हणे नाम महाजप परम । तो देह उत्तम मृत्युलोकी ॥४॥

2.
जन्माचें कारण रामनामपाठीं । जाइजे वैकुंठीं एकीहेळा ॥१॥
रामनाम ऐसा जिव्हे उमटे ठसा । तो उद्धरेल आपैसा इहलोकी ॥२॥
दो अक्षरीं राम जप हा परम । नलगे तुज नेम नाना पंथ ॥३॥
नामा म्हणे पवित्र श्रीरामचरित्र । उद्धरिते गोत्र पूर्वजेंसी ॥४॥

3.
विषयांचे कोड का करिसी गोड । होईल तुज जोड इंद्रियबाधा ॥१॥
सर्वही लटिकें जाण तू बा निकें । रामाविण एकें न सुटिजे ॥२॥
मायाजाळ मोहे इंद्रियांचा रोहो । परि न धरेचि भावो भजनपंथें ॥३॥
नामा म्हणे देवा करी तू लावलाही । मयूराचा टाहो घनगर्जना ॥४॥

4.
कांसवीचे दृष्टी जै येईजे भेटी । तै अमृताची सृष्टी घडे त्यासी ॥१॥
तैसें हें भजन श्रीरामाचे ध्यान । वाचे नारायण अमृतमय ॥२॥
धन्य त्याचे कुळ सदा पै सुफळ । दिननिशी पळ रामनाम ॥३॥
नामा म्हणे चोखट भक्‍त तो उत्तम । वाचेसी सुगम रामनाम ॥४॥

5.
सदा फळ सुफळ वाचेसी गोपाळ । वंदी कळिकाळ शास्त्र सांगे ॥१॥
ब्रह्मांडनायक ऐसे जें कौतुक । तेंचि नाम एक श्रीकृष्ण ऐसे ॥२॥
आदि अंत पाहतां नाही पै सर्वथा । परिपूर्ण सरिता अमृताची ॥३॥
नामा म्हणे अनंत का करिशी संकेत । उद्धरिले पतित युगायुगी ॥४॥

6.
गोविंद गोपाळ वाचेसी निखळ । तो उद्धरे तात्काळ कलीमाजी ॥१॥
नारायण नारायण हेंचि पारायण । उद्धरले जन इहलोकीं ॥२॥
तुटती यातना कर्माच्या भावना । जडजीवउद्धारणा नाम स्मरा ॥३॥
नामा म्हणे राम हा जप परम । न लगती नेम नाना कोटी ॥४॥

7.
तीर्थ जपराशी जप हृषीकेशी । मुखी अहर्निशी रामनाम ॥१॥
तीर्थाचें पै तीर्थ नाम हें समर्थ । होईल कृतार्थ रामनामे ॥२॥
होईल साधन तुटेल बंधन । वाचे जनार्दन सुफळ सदा ॥३॥
नामा म्हणे हरी उच्चार तू करी । उद्धरसी निर्धारी इहलोकीं ॥४॥

8.
पाहतां ये परिपाटी आणिक नाही सृष्टी। नामेंविण दृष्टी न दिसे माझ्या ॥१॥
नमचि समर्थ नामचि मथित । शंकरासी हेत रामनामी ॥२॥
भरती सर्व काम वाचे रामनाम । न लगती ते नेम कर्मजाळ ॥३॥
नामा म्हणे उच्चार न करी तू विचार । तुटेल येरझार नाना योनी ॥४॥

9.
तपाचे हें तप राम हें अमूप । करी का रे जप रामनामी ॥१॥
रामकृष्ण म्हणे वाचे नारायण । तुटेल बंधन यमपाश ॥२॥
साधेल साधन होती कोटी यज्ञ । राम जनार्दन जपे करी ॥३॥
नामा म्हणे जिव्हे नामस्मरण करी । म्हणे नरहरी एक्या भावे ॥४॥

10.
हाचि नेम सारीं साधेल तो हरी । नाम हें मुरारी अच्युताचें ॥१॥
राम गोविंद हरे कृष्ण गोविंद हरे । यादव मोहरे रामनाम ॥२॥
न लगती कथा नाना विकळता । नामचि स्मरतां राम वाचे ॥३॥
नाम म्हणे राम आम्हा हाचि नेम । नित्य तो सप्रेम जप आम्हा ॥४॥

11.
करू हें कीर्तन राम नारायण । जनी जनार्दन हेंचि देखे ॥१॥
जगाचा जनक रामकृष्ण एक । न करिता विवेक स्मरें राम ॥२॥
तुटेल भवजाळ का करिशी पाल्हाळ । सर्व मायाजाळ इंद्रियबाधा ॥३॥
नामा म्हणे गोविंद स्मरें तू सावध । नव्हे तुज बाधा नाना विघ्ने ॥४॥

12.
मायेचीं भूचरे रज तम सात्त्विक । रामनाम एक सोडवणें एक ॥१॥
राम हेंचि स्नान राम हेंचि ध्यान । नामे घडती यज्ञ कोटी देवा ॥२॥
न लगती साधने नाना मंत्र विवेक । रामनामी मुख रंगवी का रे ॥३॥
नामा म्हणे श्रीराम हेंचि वचन आम्हां। नित्य ते पौर्णिमा सोळा कळी ॥४॥

13.
माझें मी करिता गेले हे दिवस । न धरीच विश्वास राम नामी ॥१॥
अंतीं तुज उद्धरती राम कृष्ण हरी । राम पंचाक्षरी मंत्रसार ॥२॥
का करिशी सांठा प्रपंच विस्तार। न तुटे येरझार नामेंविण ॥३॥
नामा म्हणे ऐसे रामनामी पिसे । तो उद्धरेल आपैसें इहलोकी ॥४॥

14.
नको नको माया सांडीं लवलाह्या । पुढील उपाया झोंबें का रे ॥१॥
राम नाम म्हणे तुटेल बंधन । भावबंधमोचन एक्या नामे ॥२॥
स्मरतां पतित उद्धरेल यतार्थ । नाम हाचि स्वार्थ तया झाला ॥३॥
नामा म्हणे हा जप करी तू अमूप । नामे चुके खेप इये जनी ॥४॥

15.
स्मरण करिता रामनामध्वनी । ऐकतांचि कर्णी पळती यम ॥१॥
नामपाठ करा राम कृष्ण हरी । होतील कामारी ऋद्धि सिद्धि ॥२॥
साध्य तेंचि साधी न करी उपाधी । जन्मांतरीच्या व्याधी हरती नामे ॥३॥
नामा म्हणे सर्व राम हाचि भाव । नाही आणिक देव रामेंविण ॥४॥

16.
रामकृष्णमाळा घालिता अढळ । तुटेल भवजाळ मायामोह ॥१॥
होशील तू साधु न पावती बाधु । पूर्ण ब्रह्मानंदु तुष्टेल तुज ॥२॥
जपतां रामनाम पुरती सर्व काम । आदि अंति नेम साधेल तुज ॥३॥
नामा म्हणे कृतार्थ सर्व मनोरथ । न लगती ते अर्थ मायापाश ॥४॥

17.
शरीर संपत्ती मायेचें टवाळ । वायांचि पाल्हाळ मिरवितोसी ॥१॥
नाम हेचि तारी विठ्ठलनिर्धारीं । म्हणे हरी हरी एक वेळां ॥२॥
स्मरता गोपाळनामा वंदितील यम । न लगती नेम मंत्रबाधा ॥३॥
नामा म्हणे सार मंत्र तो उत्तम । राम हेंचि नाम स्मरे का रे ॥४॥

18.
कृष्णकथा संग जेणे तुटे पांग । न लगे तुज उद्योग करणे कांही ॥१॥
समर्थ सोयरा राम हा निधान । जनी जनार्दनी एक ध्यायी ॥२॥
नामा म्हणे उच्चार रामकृष्ण सार । तुटेल येरझार भवाब्धीची ॥३॥

19.
भवाब्धीतारक रामकृष्ण नांव । रोहिणीची माव सकळ दिसे ॥१॥
नाम हेंचि थोर नाम हेंचि थोर । वैकुंठीं बिढार रामनामे ॥२॥
राम हे निशाणी जपतांची अढळ । वैकुंठ तात्काळ तया जीवा ॥३॥
नामा म्हणे वैकुंठ नामेंचि जोडेल । अंतीं तुज पावेल राम एक ॥४॥

20.
जळाचा जळबिंदु जळींच तो विरे । तैसे हें विधारे पांचाठायीं ॥१॥
जीव शिव विचार नाम हें मधुर । जिव्हेसी उपचार रामनाम ॥२॥
रामनाम तारक शिव षडक्षरी । तैची वाचा करी अरे मूढा ॥३॥
नामा म्हणे ध्यान शिवाचे उत्तम । मंत्र हा परम रामनाम ॥४॥

21.
करिता हरिकथा नाम सुखराशी । उद्धरी जीवासी एका नामे ॥१॥
तें हें रामनाम जपे तू सप्रेम । जप हा सुगम सुफळ सदा ॥२॥
नामेंचि तरले नामेंचि पावले । नाम म्हणतां गेले वैकुंठासी ॥३॥
नामा म्हणे एका नामेंसी विनटे । ते वैकुंठींचे पेठे पावले देखा ॥४॥

22.
नामावांचूनि कांहीं दुकें येथे नाही । वेगी लवलाही राम जपा ॥१॥
गोविंद गोपाळ वाचेसी रसाळ । पावसी केवळ निजपद ॥२॥
धृव प्रल्हाद बळी अंबऋषि प्रबुद्ध । नामेंचि चित्पद पावले देख ॥३॥
नामा म्हणे राम वाचे जपा नाम । संसार भवभ्रम हरे नामे ॥४॥

23.
म्हणता वाचे नाम वंदी तया यम । काळादिक सम वंदी तया ॥१॥
ऐसे नाम श्रेष्ठ सकळांसी वरिष्ठ । उच्चारिता नीट वैकुंठ गाजे ॥२॥
तो हा नाममहिमा वाखाणीत ब्रह्मा। न कळे तया उपमा आदिअंतीं॥ ३॥
नामा म्हणे पाठें नामाचेनि वाटें । तरी प्रत्यक्ष भेटे विठ्ठल हरी ॥४॥

24.
विष्णुनाम श्रेष्ठ गाती देवऋषी । नाम अहर्निशी गोपाळाचें ॥१॥
हरी हरि हरि हरि तूंचि बा श्रीहरि । असे चराचरी जनार्दना ॥२॥
आदिब्रह्म हरि आळवी त्रिपुरारी । उमेप्रति करी उपदेश ॥३॥
नामा म्हणे नाम महाजप परम । शंकरासी नेम दिनदिशीं ॥४॥

25.
का करतोसी सीण वाचे नारायण । जपतां समाधान होईल तुज ॥१॥
राम कृष्ण हरी नारायण गोविंद । वाचेसी हा छंद नामपाठ ॥२॥
वंदील तो यम कळिकाळ सर्वदा । न पावसी आपदा असत देही ॥३॥
नामा म्हणे ओळंग शीण झाला संगें । प्रपंच वाउगे सांडी परते ॥४॥

26.
नामाचेनि पाठे जातील वैकुंठें । तो पुंडलीक पेठे प्रकट असे ॥१॥
विठ्ठल हा मंत्र सांगतसे शास्त्र । आणिक नाही शस्त्र नामाविण ॥२॥
पुराण व्युत्पत्ति न लगती श्रुती । मुनि हरिपंथी गेले ॥३॥
नामा म्हणे हरी नामेंचि उद्धरी । जन्माची येरझारी हरे नामे ॥४॥

27.
सर्वांभूतीं भजें नमन करी संता । नित्य त्या अच्युता स्मरण करी ॥१॥
ऐसी भजनी विनट सांपडेल वाट । रामकृष्ण नीट वैकुंठींची ॥२॥
न लगतीं साधने वायाचि बंधन । हरिनामपंथीं जाण मुनि गेले ॥३॥
नामा म्हणे थोर नामचि साधार । वैकुंठी बिढार तया भक्‍ता ॥४॥

28.
तू तव नेणता परि हरि तो जाणता । आहे तो समता सर्वा भूतीं ॥१॥
सर्वब्रह्म हरि एकचि निर्धारी । होशी झडकरी ब्रह्म तूंचि ॥२॥
अच्युत माधव अमृताच्या पाठें । लागतांचि वाते वंदी यम ॥३॥
नामा म्हणे होशी जिवलग विष्णूचा । दास त्या हरीचा आवडता ॥४॥

29.
का करिसी सोस मायेचा असोस । नव्हे तुझा सौरस नामेंविण ॥१॥
नामचेचि मंत्र नामचेचि तंत्र । नामविण पवित्र न होती देखा ॥२॥
तिही लोकी काही नामेंविण सर्वथा । अच्युत म्हणतां पुण्यकोटी ॥३॥
नामा म्हणे ब्रह्म आदि अंतीं नेम । ते विटेवरी सम उभे असे ॥४॥

30.
पवित्र परिकर हा उच्चार । उद्धरण साचार जगासी या ॥१॥
गोविंद केशव उच्चारी श्रीराम । न लगती नेम अमूप जप ॥२॥
तें हें विठ्ठलरूप पिकलें पंढरीं । नाम चराचरी विठ्ठल ऐसे ॥३॥
नामा म्हणे विठ्ठल सर्वांत सखोल । उच्चारिता मोल न लगे तुज ॥४॥

31.
पोशिसी शरीर इंद्रियांची बाधा । शेखी ते आपदा करील तुज ॥१॥
नव्हे तुझें हित विषय पोषितां । हरी हरी म्हणतां उद्धरसी ॥२॥
वायांचि पाल्हाळ चरित्रु सांगसी । परी नाम न म्हणसी अरे मूढा ॥३॥
नामा म्हणे हेचि पंढरीये निधान । उच्चारिता जन तरले ऐसे ॥४॥

32.
विषय खटपट आचार सांगसी । विठ्ठल न म्हणसी अरे मूढा ॥१॥
पूर्णब्रह्म हरी विठ्ठल श्रीहरी । अंती हा निर्धारीं तारील सत्य ॥२॥
न लगे सायास करणे उपवास । नामाचा विश्वास ऐसा धरी ॥३॥
नामा म्हणे प्रेम धरी सप्रेम । विठ्ठल हाचि नेम दिनदिशीं ॥४॥

33.
नव्हे तुज हित म्हणता विषय पोषिता । हरी हरी म्हणतां तरशील ॥१॥
माधव श्रीहरी कृष्ण नरहरी । वेगी हे उच्चारी लवलाही ॥२॥
घडतील यज्ञ पापें भग्न होत । प्रपञ्च सर्वत्र होईल ब्रह्म ॥३॥
नामा म्हणे हरिकथा हरी भवव्यथा । उद्धरसी सर्वथा भाक माझी ॥४॥

34.
उपदेश सुगम आइके रे एक । नाम हें सम्यक विठ्ठलाचें ॥१॥
जनी जनार्दन भावचि संपन्न । विठ्ठल उद्धरण कलीमाजी ॥२॥
साधेल निधान पुरेल मनोरथ । नामेंचि कृतार्थ होसी जनी ॥३॥
नामा म्हणे नाम घेई तू झडकरी । पावशी निर्धारीं वैकुंठपद ॥४॥

हरिपाठ समाप्त.......

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग