वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 122. श्रीदत्तात्रेयजन्म - अभंग ३४१०

श्रीदत्तात्रेयजन्म -

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088026 · अभंग क्र. ३४१०

3410.
श्रीदत्तात्रेयजन्म - अभंग ३४१०

ऎका दत्तात्रेय आख्यान । पार्वतीस सांगे त्रिलोचन । सकळ पतिव्रतांमाजीं पूर्ण । अनसुया जाण पवित्रता ॥१॥
ऎकोनी शिवाची वाणी । गदगदा हासे भवानी । आम्हा तिघींवरती त्रिभुवनी । श्रेष्ठ कोणी असेना ॥२॥
गर्व देखोनी पार्वतीचा । बोले त्रिलोचन तेव्हा वाचा । नारद सांगेल महिमा तिचा । तेव्हा तुज कळेल ॥३॥
ऎकोनि पार्वती मनांत । नारदाची मार्गप्रतीक्षा करीत । तंव तो मुनी अकस्मात । पावला तेथे ते क्षणी ॥४॥
देखोनिया नारदमुनी । षोडशोपचारे पूजी भवानी । आम्हा तिघींवरती त्रिभुवनी । आणीक कोणी असेना ॥५॥
ऎकोनी हांसला नारदमुनी । ऎकें पार्वती चित्त देउनी । अनसूया अत्रिपत्नी । तुम्हा तिघींहुनी पतित्रता ॥६॥
तुम्हा तिघींचे पुतळे करुनी । बांधिले असे वामचरणीं । असंख्य सामर्थ्य त्रिभुवनी । समतुल्य कोणी असेना ॥७॥
तो पार्वती झाली चिंताग्रस्त । नारदाते उपाय पुसत । तो म्हणे प्रार्था विश्वनाथ । तो तेथवरी जाईल ॥८॥
नग्न होऊनि घालीं भिक्षा भोजन । तेणे होईल तिचे छळण । ब्रिदें तुमचे देईल सोडून । मग गर्व सहजचि गळेल ॥९॥
पार्वतीसी ऎसे सागोनी । स्वये वैकुंठासी येत तत्क्षणीं । देखोनी लक्ष्मी संतुष्ट मनी । मग पूजी आदरे तयाते ॥१०॥
कर जोडूनि करी विनंती । काही नवल सांगा स्थिती । मागे झाली जे रीती । वदला प्रति विनोदें ॥११॥
म्हणे धन्य अनसूया पतिव्रता । तुम्हा तिघींहूनि समर्था । तुमचे पुतळे तत्वता । तिने तोडरीं बांधिले ॥१२॥
ऎकोनी तटस्थ झाली रमा । आता काय करु पुरुषोत्तमा । मजहुनी वाढ ऎसी सीमा । ते कैसेनी निरसेल ॥१३॥
नारद म्हणे उपाय एक । तेथे पाठवा वैकुंठनायक । नग्न भोजन मागावें देख । तेणे ते छळेल ॥१४॥
सांगोनी ऎसा वृत्तान्त । सत्यलोकासी गेला ब्रम्हसुत । सावित्री पुसे त्वरित । काही अपूर्व वर्तले ॥१५॥
मग तो म्हणे सावित्रीसी । अनसूया ऎशी गुणराशी । सामर्थ्य अधिक तियेपाशीं । पदा तिघींसी बांधिलें ॥१६॥
सावित्री म्हणे नारदाप्रत । कैसा उपाय करावा तीतें । जेणे भंगेल गर्वातें । शरण आम्हांते येईल ॥१७॥
पाहता आम्हांपासूनि उत्पत्ती । एवढी काय तिची स्थिती । टिटवी काय समुद्राप्रती । शोखू शके ॥१८॥
आम्हांहुनि काय वाड । ऎसे पीडिलें महागूढ । आता उपाय सांगा दृढ । जेणे गर्व भंगेल तिचा ॥१९॥
मग ती म्हणे नारदासी । काय उपाय करावा तिशीं । तंव तो म्हणे सावित्रीशीं । ऎक तुजसी सांगेन ॥२०॥
प्रार्थूनियां चतुरानना । पाठवावे अत्रिभुवना । जाये तू आता याच क्षणां । अवश्य वचन बोलवी ॥२१॥
म्हणावे हे नग्न भोजन । तेणे होईल तिचे छळण । मग यावे सत्व घेऊन । ब्रीद जाण तुटेल ॥२२॥
ऎसा नारद सांगून गेला । मग तिघी प्रार्थिती तिघांला । श्रुत करोनि नारद गेला । म्हणवूनि विनविती॥२३॥
ऎकुनी ऎसे वचनी । तिघे निघाले तत्क्षणीं । स्त्रियांची करुणा देखुनी मनी । कृपा आली तयांसी ॥२४॥
मग पवनवेगें ते अवसरी । तिघे प्रवेशले आश्रमाभीतरी । वाहनें ठेवूनिया दुरी । माध्यन्हकाळीं पै आले ॥२५॥
तंव ते म्हणती तिघेजण । आम्हांस घेणे अनसूयादर्शन । ऋषीने आज्ञा करुन । दाराबाहेर पाठविली ॥२६॥
ते देखोनि अत्रिऋषीनें । तिघांचे केले सांग पूजने । मग म्हणे येणे काय कारणे । आवश्यक पै झाले ॥२७॥
तंव दाराबाहेर तिन्ही मूर्ति । ब्रम्हा शिव कमळापती । नमस्कारु झालिया पुसती । काय आज्ञा ते सांगिजे ॥२८॥
ते म्हणे अनसूयेसी । तू पतिव्रतेमाजीं श्रेष्ठ म्हणविसी । तरी मागतो ते देई आम्हांसी । म्हणोनि भाकेसी गोंविलें ॥२९॥
मग म्हणती तयाप्रयी । तुमचे देणे त्रिजगती । आणि तुम्ही मागतां मजप्रती । इच्छा जैशी मागिजे ॥३०॥
देव म्हणती होऊनि नग्न । आम्हांसी घालावे भोजन । अनसूया अवश्य म्हणे । मग काय करिती जाहली॥३१॥
ठेवूनिया तिघांचे मस्तकी कर । तंव ते तिघे झाले कुमर । मग नग्न होऊनि सत्वर । करवी स्तनपान तयांतें॥३२॥
करुनि तयांची उदरतृप्ती । वसन नेसली शीघ्रगती । मग घालूनि पालखीप्रती । गाती झाली तेधवां॥३३॥
मग म्हणे चतुरानना । जो जो जो जो रे सगुणा । उत्पन्न करुनि त्रिभुवना । बहु श्रम पावलासी॥३४॥
याकारणें केले बाळ । आता राहिले कर्तुत्व सकळ । स्तनपान करोनि निर्मळ । सुखे निद्रा करावी॥३५॥
जो जो जो जो रे लक्ष्मीपती । तुझी तंव अगाध कीर्ति । अवतार धरुनि पंक्ति । दुष्टसंहार पै केलें॥३६॥
तै पावलासी थोर । निद्रा करावी बा सत्वर । म्हणोनि केला कुमर । विश्रांती सुख पावावया॥३७॥
जो जो जो जो रे बा शंकरा । महादेवा पार्वतीवरा । करोनि दुष्ट संहारा । बहु श्रम पावलासी॥३८॥
तरी आता सुखे निद्रा करी । कुमारत्व पावले यापरी । आता क्लेश नाही तरी । पालखींभीतरीं पहुडावें॥३९॥
आसे आखेद स्तनपान । पालखींत निजवी बाळके पूर्ण । नित्य गीत गायन । भक्ती ज्ञान वैराग्य॥४०॥
ऎसे गेले बहुत दिवस । मार्ग नाही जावयास । न सुटे बाळपणाचा वेष । सामर्थ्य विशेष अनसूयेचें॥४१॥
उमा रमा सावित्रीतें । थोर गर्व होता तिघींतें । तो निरसावयातें । विंदान केले नारदें॥४२॥
मागुती सांगे तिघींप्रती । काय निश्चिंत बैसल्याती । बाळके करुन तिघांप्रती । अनुसया सती खेळवितसे॥४३॥
नित्य करवी स्तनपान । षण्मासांचें बाळें करुन । पाळण्यामाजीं निजवून । गीत गायन करीतसे॥४४॥
पाहता ऋषिपत्नी जाण । परी सामर्थ्य आगळें तुम्हांहुन । तिचे तुळणें न पुरे त्रिभुवन । आता जाणे शरण तियेशीं॥४५॥
तंव त्या तिघीजणी बोलती । आम्ही तरी आदिशक्ती । आमुचे सामर्थ्य त्रिजगती । प्राणी वर्तती एकसरें॥४६॥
सुरनर गंधर्व किन्नर । पशुपक्षी अपार । आमुच्या सामर्थ्या थोर । चराचर नादंत॥४७॥
तरी आमुचे आम्हीच पती । सोडवूं आपुले सामर्थी । अनसूया ते बापुडी किती । काय तिची कीर्ति आपुल्यापुढें॥४८॥
ऎसे बोलोनी अभिमानी । तिघी निघाल्या ते क्षणी । लगबग आल्या धांवुनी । अनसूया भुवनीं तत्काळ॥४९॥
ते देखोनिया ऋषीश्वरें । तिघीं पूजिल्या षोडशोपचारे । काय आज्ञा पुसे त्वरे । ते प्रत्योत्तरें सांगिजे॥५०॥
त्या तिघीजणी बोलती । पाठवावे अनसूयाप्रती । येरें आज्ञा करुनी शीघ्रगती । स्त्रियांप्रती आणविलें॥५१॥
तंव ते पातलीसे त्वरे । केला तिघींस नमस्कार । आज्ञा पुसे सत्वर । भाग्य थोर आलेती॥५२॥
तिघी म्हणती आमुचे पती । आणून देई शीघ्रगती । तंव त्या बाळकांच्या मूर्ती । पुढे क्षिती ठेविल्या॥५३॥
तंव ते सारखे बाळ तिन्ही । बोलू नेणती वचनी । तिघी चकित झाल्या मनी । परि कोण्हा न लक्षवेना॥५४॥
सर्वही सामर्थ्य वेंचलें । अभिमान धैर्य गळालें । मग लोटांगण घातले । चरण वंदिले सतीचे॥५५॥
अनसूया थोर तू पतिव्रता । धन्य धन्य तुझी सामर्थ्यता । आम्ही लीन जाहलों पहाता । नको निष्ठुरता करु माये॥५६॥
जैसे होते आमुचे पती । तैसे करावे पुढती । अगाध धन्य तुझी कीर्ति । पूर्ण सती पतिव्रता॥५७॥
ऎकोनी सतीत्रयीचें वचन । तिघांचे मस्तकी स्पर्शे करुन । कृपायुक्त अवलोकून । पूर्वचर्यां ते आणिले॥५८॥
तिघांचे स्वरुप जैसे होती । तैशा केल्या तिन्ही मूर्ती । देव अंतरिक्षीं कवतुक पहाती । वृष्टी करिती पुष्पांची॥५९॥
दुदंभी वाजविल्या भेरी । आनंद झाला सर्वांतरीं । बोलिले सत्वरीं । अनसूया तू पतिव्रता॥६०॥
त्रये देव म्हणती धन्य माते । अगाध सामर्थ्य तुझे सत्य । प्रसन्न झालों मागा वरातें । मनोरथ पूर्ण करु हो॥६१॥
मग ते बोले करुणावचन । अपूर्व तुमचे दरुशन । मज न गमे तुम्हांविण । अर्धक्षण जाणिजे॥६२॥
तरी तिघे रुप असावे । एवढे वरदान मज द्यावे । आणीक न लगे स्वभावे । म्हणोनी भावे प्रार्थितसे॥६३॥
मग देवत्रयाची मूर्ती । करकमळीं जाली शीघ्रगती । दत्तात्रेय नामे ऎसी ख्याती । तिही लोकांप्रती विशेष॥६४॥
वर देऊनि गेला स्वस्थाना । शक्तीसहित आरुढलें वाहना । सर्व देवसमुदाय जाणा । स्वर्गभुवन पातले॥६५॥
येरीकडे दत्तात्रेय मूर्ती । बालरुपें अनसूयेप्रती । पुढे व्रतबंध झाले निश्चिती । अभ्यासिल्या सकळ कळा॥६६॥
एका जनार्दन म्हणे । दत्तात्रेय जन्मकथन । भावे करिता श्रवण । मनोरथ पूर्ण श्रोतियांचें॥६७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग