टाळघोळ सुख नामाचा गज
2052.
टाळघोळ सुख नामाचा गजर । घोषे जेजेकार ब्रह्मानंदु ॥१॥
गरुडटके दिंडी पताकांचे भार । आनंद अपार ब्रह्मादिका ॥धृपद॥
आनंदे वैष्णव जाती लोटांगणी । एक एकाहुनि भद्रजाति ॥२॥
तेणे सुखे सुटे पाषाणा पाझर । नष्ट खळ नर शुद्ध होती ॥३॥
तुका म्हणे सोपे वैकुंठवासी जाता । रामकृष्ण कथा हे ची वाट ॥४॥
अर्थ :
टाळ वाजवणे सुखाने हरीच्या नामाचा गजर करणे त्याचा घोष करून जयजयकार करणे यामुळे ब्रम्हनंदाचा आनंद प्राप्त होतो. गरुड चिन्ह असलेले पताका त्यांचे समूह वीणा यांना पाहून ब्रम्हाधीकांनाही आनंद प्राप्त होतो. हत्ती पेक्षाही बलवान असलेल्या भद्र जाती म्हणजे बलवान असलेले वैष्णव आनंदाने एकमेकांच्या पायाजवळ लोटांगण घेतात. हा हरिनाम सुख सोहंळा पाहून पाषणाला देखील पाझर फुटतो आणि नष्टदृष्ट पापी असलेले लोक देखील हा सोहंळा पाहून लुब्ध होतात. तुकाराम महाराज म्हणतात वैकुंठाला जाण्याकरता राम कृष्ण कथा हीच एक सोपी वाट आहे.
