अगा ये सांवळ्या सगुण
4020.
अगा ये सांवळ्या सगुणा । गुणनिधिनाम नारायणा । आमची परिसा विज्ञापना । सांभाळी दीना आपुलिया ॥१॥
बहु या उदराचे कष्ट । आह्मांसि केले कर्मभ्रष्ट । तुमचे चुकविली वाट । करी वटवट या निमित्ये ॥धृपद॥
झालो पागिला जनासी । संसाराची आंदणी दासी । न कळे कधी सोडविसी । दृढपाशी बहु बांधलो ॥२॥
येथे तो नये आठव काही । विसावा तो क्षण एक नाही । पडिलो आणिके प्रवाही । हित तो काही दिसेचि ना ॥३॥
जीवित्व वेचलो वियोगे । हिंडता प्रवास वाउगे । काही व्याधि पीडा रोगे । केलिया भोगे तडातोडी ॥४॥
माझा मींच जालो शत्रु । कैचा पुत्र दारा कैचा मित्रु । कासया घातला पसरु । अहो जगद्गुरु तुका म्हणे ॥५॥
अर्थ :
हे सावळया सगुणा नारायणा तू म्हणजे गुणाचा ठेवाच आहेस. देवा तुम्ही आपल्या दीनभक्तांचा सांभाळ करावा ही एवढीच एक आमची विनंती तुम्ही ऐका. आमच्या उदरनिर्वाहाचे मोठे कष्ट आम्हाला आहे आणि त्या योगाने आम्ही नको ते व्यवहार करुन कर्मभ्रष्ट झालो आहोत. त्यामुळे आम्ही तुमच्या प्राप्तीचा मार्ग चुकलो आहोत आणि उदरनिर्वाहाच्या निमित्ताने आम्ही नको ती वटवट करीत बसलो आहोत. संसारामुळे मी लोकांचा अंकित झालो आहे आणि आंदन दिलेल्या दासीप्रमाणे मी संसाराचा दास झालो आहे. तू मला यातून कधी सोडवशील हे मला काही कळत नाही मी तर संसाराच्या जवळ अगदी पक्का बांधला गेलो आहे. या संसारामध्ये तर तुझी आठवणच येत नाही आणि विश्रांती म्हणशील तर क्षणभर देखील संसारात नाही. अशा प्रकारे मी या संसाराच्या प्रवाहामध्ये आणखीच पडलो आहे आणि माझे हित तर येथे मला काहीच दिसत नाही. देवा जन्ममरणाच्या व्यर्थ प्रवास
