हा अभंग साखरे महाराज
997.
हा अभंग साखरे महाराज यांच्या प्रतीमध्ये व गीता प्रेस सकल संत गाथामध्ये नाही
भावाची मी सौरी जाले ।
गेले संतापाशी ।
ज्ञानखड्ग घेउनि हाती लिंगदेही नाशी ॥१॥
चाल माझी विठो ।
तुम्ही आम्ही भेटो ॥धृ॥
तीन माचवे पाच गाते ।
त्यावर निजले होते ।
फटफटीत उजेड खाटले पडले रिते ॥३॥
कर्म नेणे धर्म नेणे नेणे आणिक काही ।
ज्ञानदेव म्हणे आम्हा येणे जाणे नाही ॥४॥
अर्थ :
परमात्म्याविषयी मनांत भाव धारण करुन मी सौरी झाले व संतांपाशी गेले. त्यांनी दिलेले ज्ञानरुपी खड्ग हातांत धारण करुन मी माझ्या लिंगदेहाचा नाश केला. विठोबा चल, तुम्ही व आम्ही एकत्र भेटू पंचमहाभूताचे व त्रिगुणात्मक शरीररुपी माचव्यावर मी झोपले होते. व याच नादांत स्वानुभूतीचा फटफटीत उजेड पडला. व माझे खाट रिकामी झाली. व त्यामुळे ऐक्यरुपाची अवस्था झाली. आम्ही या श्रीविठ्ठलावांचून दुसरे कर्मधर्मादि काही जाणत नाही व आम्हास यापुढे जन्म मरणाचा त्रासही नाही. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
हा अभंग साखरे महाराज यांच्या प्रतीमध्ये व गीता प्रेस सकल संत गाथामध्ये नाही
