वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ७. उत्तरकाण्ड - अध्याय 77 › २३. शंबूक प्रसंग

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088339 · अभंग क्र. २३

23.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

उत्तरकांड

॥ अध्याय तेविसावा ॥
वाली- रावणाचे सख्य

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

रणी धरोनि रावण । सहस्त्रार्जुनें केले बंधन ।
तेथे पुलस्ति मुनि येऊन । मागोनि दशानन सोडविला ॥१॥
पुलस्ति गेला स्वर्गासी । मागे रावण विचरे अवनीसीं ।
जे जे राजे जे जे देशी । त्या त्या स्थाळासी आपण जाये ॥२॥
तयांते जिंती रावण । राक्षस अथवा राजे जाण ।
अथवा देव सिद्ध चारण । अधिक बळ ऐकोन संग्राम करी ॥३॥

रावणाचे किष्किंधेला आगमन :

तदनंतरे लंकानाथ । हिंडत असता प्रधानांसमवेत ।
तंव पुढे किष्किंधेचा प्रांत । देखोनि त्वरित तेथे आला ॥४॥
ते किष्किंधा नगरी कैसी । दुसरी अमरावती ऐसी ।
पुरंदरात्मज पाळी जियेसी । वर्णना तिसी न करवे ॥५॥
भोंवती नाना परीची वने । सरोवरें भरलीं शीतळ जीवनें ।
देखोनि मार्गस्थांचीं मने । थोर विश्रांति पावती ॥६॥
पंपासरोवराचे तीरीं । ब्रह्मयाने वसवली नगरी ।
इंद्रादिका अटक भारी । तेथे राज्य करी शक्रसुत ॥७॥
देवा वाळी दैत्या वाळीं । सिद्ध चारण कांपती चळीं ।
इंद्रवरदमाळा जवळी । बळे वाळी अजिंक्य देवा ॥८॥
ऐसा वाळीच्या पुरासी । रावण आला दशशिसी ।
नगरद्वारीं प्रवेशता प्रधानासी । वाळीचिया देखिले ॥९॥

रावणाचे वालीला आव्हान :

रावण म्हणे गा मंत्रिया तारा । जाणवीं आपुलिये वानरेश्वरा ।
युद्धकारणें दशशिरा । येथे येणे पै झाले ॥१०॥
जरी सामर्थ्य असेल तुम्हांसी । तरी युद्ध करावे मजसी ।
नाही तरी शरण रावणासी । शीघ्रकाळेसीं पै यावे ॥११॥

समुद्रस्नानाहून वाली येईपर्यंत धीर धरण्याची रावणाला सूचना :

ऐसे रावणाचे वचन । तार-प्रधाने ऐकोनि जाण ।
प्रत्युत्तर छळणेंकरुन । तयाप्रती बोलतसे ॥१२॥
तारापतिवाळीसीं रण । करू इच्छितोसी रावण ।
तरी धीअ धरी एक क्षण । शक्रसुत येईल आता ॥१३॥
राजा वाळी तो स्नानासी । गेला असे समुद्रासी ।
संध्या सारोनि तुम्हांपासीं । येईल युद्धासी करावया ॥१४॥
सहजस्थितीं किष्किंधानाथ । नित्य चतुःसमुद्रीं स्नानसंध्या करीत ।
तो ये तंवपर्यंत । स्वस्थचित्तें असावे ॥१५॥

वाळिच्या अचाट सामर्थ्याचे रावणाकडे वर्णन :

ऐके लंकेशा सावधान । तुवा जरी केले अमृतपान ।
तरी वाळिहस्तें तुझा प्राण । क्षणार्धे जाण जाईल ॥१६॥
जरी तू झालासी वज्रशरीरी । तरी वाळीपुढें तुझी नुरेचि उरी ।
निमेषामाजि समुद्र चारी । स्नान करोनि जो येतो ॥१७॥
देवा दानवां मागतां रण । तिही पाठविला वाळीपासीं जाण ।
तो दुदुभि समरांगण । वानरेसीं करु पाहे ॥१८॥
ऐसा दुंदुभि समर्थ । वाळिने मारिला निमेषांत ।
पैल पडिलासे कलेवरपर्वत । मंदराचळ दुसरा ॥१९॥
जरी तुज प्रसन्न त्रिपुरारी । तुवा जिंतिले राजे पृथ्वीवरी ।
तरी वाळिदर्शने तुझी उरी । नुरे निर्धारी जाणतो मी ॥२०॥
अथवा तांतडी असेल तुझे पाटी । तरी जाय दक्षिण-समुद्राचे तटीं ।
रायासीं तुज होईल भेटी । संग्रामी सुखी करील ॥२१॥
दक्षिणसागरीं करोनि स्नान । बैसलासे कपि दुसरा भान ।
तेजे अत्यंत विराजमान । देखोनि मन निवेल तुझे ॥२२॥

वालीशी युद्ध करण्यासाठी रावण समुद्रावर गेला :

वाळी आहे समुद्रतीरी । ऐसे ऐकोनि सुरारी ।
चालिला जैसा कज्जळगिरी । बहु क्रोधेंकरीं उंचबळत ॥२३॥
दुरोनि देखिला ताराकांत । ध्यानस्थ बैसला जैसा पुण्यपंडित ।
तयासी धरावया निशाचरनाथ । पुष्पकावरोनि उतरला ॥२४॥
बक जैसा गंगातीरी । हळुच पावलीं मत्स्य धरी ।
सांचोळ नव्हतां तस्कर घरी । लक्ष्मीवंताचे पै रिघे ॥२५॥
तैसा रावण हळुच पाउली । चालिला पापी धरावया वाळी ।
तंव तो शक्रसुत नेत्रकमळीं । रावणातें अवलोकी ॥२६॥

रावण आपल्या वीस हातांनी वालीला
पकडण्यासाठी जाताच वालीनेच त्याला काखेत पकडले :

विसांही भुजींकरुन । धरु गेला जों रावण ।
तंव वाळीनें हात उचलोन । कांखेतळीं दडपिला ॥२७॥
दहा शिरें लंकानाथा । कांखेखालें झाला दडपिता ।
पुनरपि तो समुद्री तत्वता । स्नानकरणें जाता झाला ॥२८॥
रावण असोनि कांखेतळीं । करिता समुद्री आंघोळी ।
नाकी तोंडी क्षारजळीं । कासावीस रुदन करी ॥२९॥
वाळी अवलोकी नावेक । तंव दहा तोंडे काळे मुख ।
दाही मस्तकी मुकुट देख । भुजा विंशति लोंबती ॥३०॥
शरीर दीर्घ लंबायमान । कांखेतून लोंबती चरण ।
जैसा खगेश्वर पन्नग धरुन । नेतसे तैसा वाळीही ॥३१॥
ऐसा चहू समुद्री संध्यातर्पण । करोनि अमरेशनंदन ।
श्रमरहित वीर जाण । नगरप्रांतालागोन पै आला ॥३२॥
म्हणे म्या घालोनि काखेतळी । केलिया समुद्री आंघोळी ।
तरी कोण दशा तया झाली । विचारोनी भलीं पाहो पा ॥३३॥

समुद्रस्नानाने कासावीस झालेल्या रावणाची वालीकडून सुटका :

ऐसे विचारुन ताराकांत । मग दोन्ही उचलिले हात ।
तंव कांखेतून लंकानाथ । सुटोनि पुढे पडियेला ॥३४॥
वाळी म्हणे तू कोणाचा कोण । दक्षिणसमुद्रीं यावया काय कारण ।
मज धरीत होतासि किंनिमित्त जाण । समूळ कथन सांग आता ॥३५॥
वाळी हांसोन ते काळी । विस्मयो पूर्ण हृदयकमळीं ।
तंव राक्षसेंद्र बद्धांजळी । विनविता झाला ते समयी ॥३६॥
शुक्रसुता तुझ्या बळाची थोरी । उपमा देवों तरी य त्रिभुवामाझारी ।
वीर देखिले परी तुझी सरी । कल्पांती ते न पावती ॥३७॥
म्या आपुलेनि बळे मही । जिंतिलि चतुःसमुद्र पाही ।
परी तुझ्या बळा समता नाही । माझ्या दृष्टी पडिली आजवरी ॥३८॥

रावणाची शरणागती व वालीजवळ मैत्रीची इच्छा :

मी आलो युद्धकारणें । त्वा मज धरोनि चतुःसमुद्रीं स्ननें ।
केलीं आता मज रक्षणें । जीवदान झणें देवोनी ॥३९॥
श्रम न पावतां वाळी । तुवा मज घालोनि कांखेतळी ।
केल्या समुद्री आंघोळी । तू आतुर्बळी त्रिभुवनी ॥४०॥
आता वानरेशा अवधारी । तुवा मजसी करावी मैत्री ।
आम्हा तुम्हा साक्षी अग्नि धरित्री । आणि साक्षी द्विजदेव ॥४१॥
माझे स्त्रीं पुत्र ऐश्वर्य । आणिकही जे पदार्थ तव सर्व ।
तुज मज वेगळीकभाव । नाही गौरव हा मैत्रीचा ॥४२॥
तुमचे आमचें इष्टपण । हे त्रैलोक्यी होय भूषण ।
मी तुझा मित्र हे देवगण । थोर भयातें पावती ॥४३॥

परस्परांचे सख्य :

मिळोनिया दोघी जणीं । मित्रत्व करू साक्षी अग्नी ।
मग प्रवेशले किष्किंधा भवनी । राक्षसेश्वर आणि हरिपुंगव ॥४४॥
अमरेंद्रसुत पौलस्तितनयो । एक होऊनी वीर-बाहो ।
किष्किंधा प्रवेशले सोमसूर्यो । मंडळीं पहा हो गगनाचिये ॥४५॥
की सिंह प्रवेशे पर्वतदरीं । की व्याघ्र वसे झाळीभीतरीं ।
की गुहेसी वसिजे योगीश्वरीं । तयापरी नगरी स्थिरावले ॥४६॥
एकमासपर्यंत राघवारी । राहिला होता किष्किंधापुरी ।
मग प्रधानांसमवेत सुरारी । त्रैलोक्यी विचरता झाला पै ॥४७॥
ऐसे पूर्वी थोर थोर । ते रावणे केले किंकर ।
तया रावणातें कपीश्वर । कांखे असोनि हिंडिन्नला ॥४८॥
ऐसा शक्रसुताचा पराक्रम । देवा दानवां दुर्घट परम ।
तया निर्दाळिता तो तू श्रीराम । पूर्णब्रह्म अवतार ॥४९॥
पतंग जैसा दीपावरी । बुडोनि मरे स्नेहाभीतरीं ।
तैसे तुवा आपुले वैरी । रणसागरी मारिले ॥५०॥
एका जनार्दना शरण । श्रीराम कथा भवतारण ।
पुढील कथानुसंधान । ते निरुपण अति गोड ॥५१॥
स्वस्ति श्रीभावार्थरामयणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
रावणवाळिमित्रत्वं नाम त्रयोविंशतितमोऽध्यायः ॥२३॥ ओंव्या ॥५१॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग