वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ७. उत्तरकाण्ड - अध्याय 77 › ४४. कालपुरुष आगमन

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088340 · अभंग क्र. ४४

44.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

उत्तरकांड

॥ अध्याय चव्वेचाळिसावा ॥
श्रीरामांची बंधूंशी भेट

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

भरत,शत्रुघ्न व लक्ष्मणांना बोलावून आणण्याची रामांची आज्ञा :

विसर्जून सभेचे जन । बुद्धिनिश्चित श्रीरघुनंदन ।
समीप द्वारपाळासी जाण । आज्ञा करिता पै झाला ॥१॥
अगा द्वारपाळा सज्ञाना । लक्ष्मणभरतशत्रुघ्नां ।
वेगी पाचारीं मम दर्शना । कार्याकारण पै असे ॥२॥
येरे प्राणिपात करोनि स्वामीसी । निघाला सौमित्रभवनासी ।
मार्गी न करोनि वलंबासी । अति त्वरेंसी चालिला ॥३॥

दूताच्या सांगण्यावरुन तिघेही रामभेटीसाठी निघाले :

वेगी प्रवेशला सौमित्रमंदिरी । तंव संमुख लक्ष्मण ते अवसरी ।
देखोनिया जोडले करी । नमस्कार पै केला ॥४॥
तुमचिया भेटीकारणें । बोलावूं पाठविले रघुनंदने ।
ऐसे ऐकता लक्ष्मणे । रथारुढ पै झाला ॥५॥
रत्नजडित स्यंदनावरी । आरुढोनि सौमित्र ते अवसरी ।
चालिला जेथे कनकमृगारी । बैसलासे तिष्ठत ॥६॥
लक्ष्मण चालिला देखोन । दूत प्रवेशला भरतभवन ।
संमुख देखोनि कैकेयीनंदन । दोनी कर जोडोन नमन केले ॥७॥
विनंती अवधारी राजेंद्रा । तुमचे भेटीची उत्कंठा श्रीरामचंद्रा ।
बोलावू पाठविले गुणसमुद्रा । तुम्हांकारणे मजलागी ॥८॥
दूतमुखींचे ऐकोनि वचन । वेगी उठिला कैकेयीनंदन ।
महापराक्रमी चरणचालीं गमन । अग्रजभेटी निघाला ॥९॥
भरत निघाल्याउपरी । दूत प्रवेशला शत्रुघ्नमंदिरी ।
विनीत होवोनी जोडिल्या करी । शत्रुघ्नासी नमस्कारिलें ॥१०॥
दूत म्हणे जी शत्रुघ्ना । तुमचे भेटीचे आर्त श्रीरघुनंदना ।
भरत लक्ष्मण अग्रजभवना । भेटावया पै गेले ॥११॥
तुम्हांसि बोलवावयालागून । मज पाठवी श्रीरघुनंदन ।
तरी आता शीघ्रगमन । श्रीरामाभेटी निघावें ॥१२॥
दूतमुखींची ऐकोनि गोष्टी । शत्रुघ्न तेव्हा उठाउठी ।
निघाला श्रीरामाचे भेटी । चरणचालीं सत्वर ॥१३॥
सवेंचि दूत पुढे येवोन । श्रीरामासी करोनि नमन ।
म्हणे स्वामी आलेती भरत शत्रुघ्न । लक्ष्मण द्वारी उभे असती ॥१४॥
श्रीराम चिंतातुर मानसी । दूतासि म्हणे तिघां बंधूंसी ।
पाचारीं मज समीपेंसीं । त्वरेंकरोनि येथवरी ॥१५॥
सवेंचि दूत द्वारा पै आला । म्हणे राजपुत्र हो भीतरी चला ।
तुमचे भेटीस उताविळा । श्रीराम बैसलासे ॥१६॥

तिघांचे रामांना अभिवादन :

तिघे बंधु समीप येवोन । तिघीं वंदिला रघुनंदन ।
मुख कोमाइलें कळाहीन । जैसा शशी ग्रहणाचा ॥१७॥
तिही राम देखिला कैसा । संध्याकाळींचा सूर्य जैसा ।
अति दीनमुख चंद्र कळाषोडशा । उतरोनि जैसा द्वितीयेचा ॥१८॥
हतशोभा मुखकमळी । जैसी कमळिणी सुके जळीं ।
हृदयी चिंतेची काजळी । तयाते जाणो सरली पै ॥१९॥
ऐसा श्रीराम कळाहीन । देखोनी तिघे बंधु जाण ।
श्रीरामचरणीं मस्तक ठेवोन । दीर्घ नमस्कार तिही केला ॥२०॥
तयांचा देखोनि अति आदर । वेगी उठवी धरणिजावर ।
दोही बाही आलिंगूनि सत्वर । तिघे बंधु सुखी केले ॥२१॥
बैसोवोनी तिघे बंधु । तयांसी बोलिला कृपासिंधु ।
तुम्ही माझे सखे सुहृदु । प्राणाहुनि पढियंते ॥२२॥
तुमचे आज्ञेकरुन । मी राज्य करितो श्रीरघुनंदन ।
तुम्ही कुशल ज्ञाते शास्त्रज्ञ । स्वधर्मी निपुण पै तुम्ही ॥२३॥
तुम्ही मजलागी करिता स्वकर्म । तुम्ही मजलागी करिता स्वधर्म ।
तुम्ही मजलागी करिता व्रतनेम । धर्मपरायण पै तुम्ही ॥२४॥
ऐसे श्रीरामाचे वचन । ऐकोनि तिघे बंधु जाण ।
हृदयी निवाले परी मुख देखोन । झाले आपण चिंतातुर ॥२५॥
एका जनार्दना शरण । पुढे बंधूंसीं संवाद होईल जाण ।
मग सीतावनप्रयाण । लक्ष्मण जाऊन करील ॥२६॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
श्रीरामबंधुदर्शनं नाम चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः ॥४४॥ ओंव्या ॥२६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग