अगा ये उदारा अगा विश
3383.
अगा ये उदारा अगा विश्वंभरा । रखुमाईच्या वरा पांडुरंगा ॥१॥
अगा सर्वोत्तमा अगा कृष्णा रामा । अगा मेघश्यामा विश्वजनित्या ॥धृपद॥
अगा कृपावंता जीवन तू दाता । अगा सर्वसत्ता धरितिया ॥२॥
अगा सर्वजाणा अगा नारायणा । करुणवचना चित्त द्यावे ॥३॥
तुका म्हणे नाही अधिकार तैसी । सरती पायापाशी केली मागे ॥४॥
अर्थ :
हे उदारा, हे विश्वंभरा रुक्मिणीच्या वरा पाडूरंगा. हे सर्वोत्तमा, हे कृष्णा रामा, हे मेघश्यामा विश्वजनित्या. हे कृपावंता जीवनदान देणाऱ्या दाता, सर्व सत्ताधारण करणाऱ्या देवा, हे सर्व जाणत्या हे नारायणा माझ्या करुण वचनाकडे तुम्ही चित्त दयावे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा अजामेळसारख्या पाप्याचा कोणत्याही प्रकारचा अधिकार नसताना देखील तुम्ही त्याला तुमच्या पायाशी मान्य केले तर माझ्यासारख्या पाप्याला देखील तुमच्या पायाजवळ मान्य करुन घ्यावे.
