असत्य वचन होता सर्व
1638.
असत्य वचन होता सर्व जोडी । जरी लग्नघडी परउपकार ॥१॥
जाईल पतना यासि संदेह नाही । साक्ष आहे काही सांगतो ते ॥धृपद॥
वदविले मुखे नारायणे धर्मा । अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला ॥२॥
तुका म्हणे आता सांभळा रे पुढे । अंतरिचे कुडे देईल दुःख ॥३॥
अर्थ :
असत्य वचन केव्हाही बोलू नये त्याचा दुसऱ्याला लाभ होत असेल तरीही बोलू नये. एवढेच काय लग्न जुळवून आणण्याचा परोपकार घडत असेल तरीही खोटे बोलू नये. जो कोणी खोटे बोलेल तो पतनास जाईल हे सत्य आहे व याला साक्ष देखील आहे मागे झालेली एक कथा मी सांगत आहे ती तुम्ही ऐका. एकदा असे झाले की युद्ध चालू होते त्यावेळेला " अश्वत्थामा मेला असे जोरात म्हण असे म्हण व तो मनुष्य आहे की हत्ती आहे असे हळू हळू बोल " असे स्वतः भगवंत श्रीकृष्ण श्रीकृष्णाने धर्मराजाला सांगितले व धर्मराजाने देखील तसेच केले पण ज्यावेळी धर्मराजा स्वर्गात जात होता त्यावेळी त्याच्या पायाचा अंगठा गळून पडला. तुकाराम महाराज म्हणतात हे लोकांनो तुम्ही आता तरी सावध व्हा खोटे बोलू नका तुम्ही जर खोट बोलला तर तुम्हाला तुम्ही खोटे बोलण्याची भावना शेवटी दुःख देईल.
