सासवडमाहात्म्य
१६.
सासवडमाहात्म्य
१२९.
नामयाचा धरूनि हात । सांगे संवत्सराची मात ।
विठोजि म्हणे देई चित्त । ऐक गुह्यार्थ सांगतो ॥१॥
ही पुण्यभूमी पवित्र देखा । याची मूळ आदि पीठिका ।
सिद्धेश्वर नागेंद्र देखा । पुरातन नांदती ॥२॥
या इंद्रनील पर्वती । तप तपिन्नले अमरपती ।
आणि सूर्यमूखा वरुती । प्रत्यक्ष मूर्ति श्रीशंकराची ॥३॥
ही स्मशानभूमिका आधी । येथे सोपान देवा समाधी ।
पुढें राहिला कैलासनिधी । सन्मुख वाहे भागीरथी ॥४॥
इची करिता पंचक्रोशी । चुके जन्ममरण चौर्यांशी ।
चारी मुक्ती होती दासी । येउनि चरणासी लागती ॥५॥
तो हा सोपान निधान । याचे करिता नामस्मरण ।
सेना कर जोडून । जाती जळून महादोष ॥६॥
१३०.
वाचे सोपान म्हणतां । चुके जन्ममरण चिंता ॥१॥
वस्ती केली कर्हे तीरीं । पुढें शोभे त्रिपुरारी ॥२॥
सोपानदेव सोपानदेव । नाही भय काळाचे ॥३॥
सोपान चरणी ठेउनि माथां । सेना होय विनविता ॥४॥
१३१.
ब्रह्मियाचा अवतार । तो हा सोपान निर्धार ॥१॥
याचे घेतां मुखी नाम । हरे सकळही श्रम ॥२॥
समाधीपासुनी भागीरथी । स्नानालागी नित्य येती ॥३॥
अष्टोत्तर तीर्थाचा मेळा । नाम कर्हाबाई वेल्हाळा ॥४॥
वैष्णवांमाजी डिंगर । सेना तयाचा किंकर ॥५॥
१३२.
वैकुंठवासिनी कृपावंत माउली । जगा तारावया अळंकापुरा आली ॥१॥
शिव तो निवृत्ति आदिमाया मुक्ताई । ब्रह्मा तो सोपान विष्णु ज्ञानदेव पाहीं ॥२॥
येउनी प्रतिष्ठानी पशुवेद बोलविला । पंडित ब्रह्मज्ञानी यांचा गर्व हरिला ॥३॥
तप्तीतीरवासी चौदाशें वर्षांचा होता । तयाचा अभिमान गर्व हरी आदिमाता ॥४॥
वाळितां ब्राह्मणी स्वर्गाचे पितर आणविले । सेना म्हणे जगी पूर्णब्रह्म अवतरलें ॥५॥
