संत जनाबाई अभंग.
2257.
संत जनाबाई अभंग.
नामयाचे घरी असे दासी जनी । तिने चक्रपाणी वश केला ॥१॥
करिता कामधंदा ध्यानी नारायण । करीत चिंतन अहोरात्न ॥२॥
देखोनिया भाव तिचा पांडुरंग । काम करू लागे जनीलागी ॥३॥
रात्री येऊनिया जनीचिया घरी । दळू लागे हरी तिजलागी ॥४॥
दळिता काढिली माळ विजयंती । ठेविली परती शालजोडी ॥५॥
जनीचे आवडे देवाजीस गाणे । झालासे तल्लिन पांडुरंग ॥६॥
प्रात:काळ झाला तेव्हा त्या समयासी । जात हृषिकेशी तांतडीने ॥७॥
घेऊनिया गेले जनीची वाकळ । विसरले माळ शाल जोडी ॥८॥
तेव्हा पुजार्यानेंज उघडिले द्वार । पाहिला तो वर रुवक्मिणीचा ॥९॥
देवाच्या अंगावर देखिली वाकळ । नाही गळा माळ शालजोडी ॥१०॥
एकमेका तेव्हा पुसती पुजारी । कोणे केली चोरी देवाजीची ॥११॥
शोध करितांना जनीची वाकळ । आले ते सकळ तिच्या घरी ॥१२॥
शालजोडी माळ होती तिचे घरी । दाविती पुजारी सर्वांलागी ॥१३॥
बांधियेली तेव्हा त्यांनी दासी जनी । नामया लागुनी श्रुत केले ॥१४॥
नामा म्हणे जने कांगे केली चोरी । बोलतसे खरे जनी त्यासी ॥१५॥
रात्नी माझ्या घरा आले पांडुरंग । दळिता श्रीरंगा घाम आला ॥१६॥
काढियेली माळ तेव्हा शालजोडी । गातसे आवडी मजसवे ॥१७॥
प्रात :— काळी देव गेले ते उठोनी । न कळे करणी कैसी ॥१८॥
बापा मी सांगते हेंचि हो प्रमाण । पुसावे जाऊन पांडुरंगा ॥१९॥
नामा म्हणे तुम्हा कळेल तैसे करा । नका या विचारा पुसो मज ॥२०॥
नामा म्हणे जने केले असे कर्म । जाणे एक वर्म पांडुरंग ॥२१॥
धमकावुनी नेली त्यांणी दासी जनी । सकळ ब्राम्हाणी मिळोनिया ॥२२॥
श्रुत केली वार्ता गांर्वांच्या राजाला । ते म्हणे जनीला शूळी द्यावे ॥२३॥
शूळ तो रोंविला चंद्रभागेतीरी । पहती नरनारी द्दष्टी तेव्हा ॥२४॥
जनी आठवीत तेव्हा पांडुरंगा । का गा तू श्रीरंगा मोकलिसी ॥२५॥
घडी घडी येत होतासी तू देवा । आज का केशवा निद्रा आली ॥२६॥
कोठे गुंतलासी भक्तीचिया काजा । धांवे महाराजा येई आता ॥२७॥
प्रल्हादाकारणे नृसिंह झालासी । स्तंभी प्रकटसी क्षणमात्रे ॥२८॥
दीनांचा दयाळू तुझे नांव बापा । का हो अवकृपा केली मज ॥२९॥
द्रौपदीने केला जेव्हा तुझा धांवा । आलासी केशवा क्षणामाजी ॥३०॥
माझा तुज देवा आला हो कंटाळा । आळ हा घातला मजवरी ॥३१॥
समजले मज होते तुझे मनी । नसावी हे जनी पांडुरंगा ॥३२॥
करिता कामधंदा तुज आला शीण । कंटाळले मन देवा तुझे ॥३३॥
कासयासी बोल ठेवू तुज देवा । प्रारब्धाचा ठेवा फळा आला ॥३४॥
आता ऐक माझी हेचि विनवणी । भेट चक्रपाणी एक वेळा ॥३५॥
न मागे मी कांही देवा तुज आता । पाया पै अनंता ठाव देई ॥३६॥
ऐकूनिया ऐसी जनीची विनवणी । आले चक्रपाणी धांवोनिया ॥३७॥
जनीच्या सांगाते होते राजदूत । नेलीगे त्वरित शूळापाशी ॥३८॥
जनीने तो शूळ पाहाता नयनी । अकस्मात् पाणी झाले त्याचे ॥३९॥
शस्त्रे जी का होती राजदूता करी । विराली ती सारी पाणी झाले ॥४०॥
विठोबाने तेव्हा आलिंगिली जनी । म्हणे माय बहिणी श्रमलीसी ॥४१॥
जनी म्हणे देवा तू पाठीसी असता । नाही भय चिंता आम्हालागी ॥४२॥
श्रुत झाली वार्ता राजया लागोनी । शूळासूद्धा पाणी शस्त्रे झाली ॥४३॥
समजले तेव्हा तयाचे अंतरी । जनीला श्रीहरी सांभाळितो ॥४४॥
चला जाऊ आता जनीच्या दर्शना । सिद्ध झाली सेना पाय चाली ॥४५॥
क्षमा करी माते आमुचे अन्याय । कृपा द्दष्टी पाहे आम्हांकडे ॥४६॥
देऊनिया वस्त्रे भूषणे जनीसी । गेला आश्रमासी राजा तेव्हा ॥४७॥
समजले तेव्हा पंढरीच्या लोका । जनीचा हा सखा पांडुरंग ॥४८॥
जनीचे अभंग लिहीत नारायण । करिती श्रवण साधुसंत ॥४९॥
धन्य तेचि जन धन्य तिची भक्ति । नामदेव स्तुति करीतसे ॥५०॥
