केशव पुसे नामयासी |
1788.
केशव पुसे नामयासी | तुझी नांदणूक कैसी ॥१॥
आम्हा काय उणे काय उणे | तुझेनि धर्मे दातारा ॥२॥
तुम्हा घरी बोचके लुगडी | आम्हा घरी पोरे उघडी ॥३॥
तुम्हा घरी दुर्ग दारवंटा | आम्हा घरी बारा वाटा ॥४॥
तुम्हा घरी गाई म्हैशी | आम्हा घरी उंदिर घुशी ॥५॥
तुम्हा घरी बटकी दासी | आम्हा घरी आहेत लासी ॥६॥
तुम्हा घरी शेजा बाजा | आम्हा घरी तृण सेजा ॥७॥
तुम्हा घरी सुवर्ण मडकी | आम्हा घरी खापरे फुटकी ॥८॥
तुम्हा घरी लेकुरे वाडे | आम्हा घरी तुळशी झाडे ॥९॥
नामा म्हणे तुमचे घरी सोने दाम | आमुचे घरी तुमचे नाम ॥१०॥
