अंबुला विकुनी पवित्र
930.
अंबुला विकुनी पवित्र झाली ।
पोटींची बाळे कौतुकी मारिली ॥१॥
पापा वेगळी मी जाले वो नारी ।
विठ्ठला घरी नांदतसे ॥२॥
आशा तृष्णा नणंदा मारिल्या ।
शेजारी राहविल्या संतसंगे ॥३॥
बापरखुमादेविवर विठ्ठल भोगिला ।
मज पै लाधला गुणेवीण ॥४॥
अर्थ :
एक गौळण म्हणते मी अहंकाररूपी नवऱ्याला विकून टांकून पवित्र झाले. आणि पोटातील काम क्रोधादिक जी मुले त्यांचा कौतुकाने नाश केला. विशेषण जे अंतःकरण त्याचा त्याग केल्याबरोबर मी पापावेगळी झाले. पापा वेगळी झाली म्हणून परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी आनंदाने नांदते. आशा, तृष्णा या लौकिकवृत्तीच्या नणंदा मी मारून संताच्या संगतीत राहू लागले. यामुळे निर्गुण असणारे माझे पिता व रखुमाईचे पती श्रीविठ्ठल मला लाधले. त्याचे आनंदाचा भोग मी माझे ठिकाणी काही एक गुण नसतांना भोगला असे माऊली सांगतात.
