लडिवाळ नामा विठोबाचा
3631.
लडिवाळ नामा विठोबाचा दास । तयाचे चरणा दंडवत ॥१॥
भक्त शिरोमणी लाडका डिंगर । आवडता फ़ार विठोबाचा ॥२॥
कवित्व करुनी तारिले सकळ । निरभिमानी निर्मळ सदोदित ॥३॥
नामावांचुनी कांही नेणे तो नामा । तयाचा तो प्रेमा पांडुरंगीं ॥४॥
ऐसिया संतांसीं नमन माझे भावे । एका जनार्दनी जावे वोवाळुनी ॥५॥
