काय धोविले बाहेरी मन
2182.
काय धोविले बाहेरी मन मळले अंतरी । गादले जन्मवरी असत्यकाटे काटले ॥१॥
सांडी व्यापार दंभाचा शुद्ध करी रे मन वाचा । तुझिया चित्ताचा तू च ग्वाही आपुला ॥धृपद॥
पापपुण्यविटाळ देही भरिता न विचारिसी काही । काय चाचपसी मही जी अखंड सोंवळी ॥२॥
कामक्रोधा वेगळा ऐसा होई का सोवळा । तुका म्हणे कळा गुंडुन ठेवी कुसरी ॥३॥
अर्थ :
मन हे आत मधून षडविकारणे मळालेले आहे आणि वर वरचे शरीर काय धुतले आहे? हे मन आत मधून जन्मभर केलेल्या पापाने षडविकाराने गांधलेले आहे ते असत्यरूपी व्यवहार दोषानी भरलेले आहे. त्यामुळे दंभाचा व्यापार टाकून दे आणि अंतकरणापासून मन आणि वाचा शुद्ध कर. मग तुझी वाणी व मन शुद्ध झाले की नाही याला तुझे चित्तच तुला आपण होऊन साक्ष देईल. देह तर मुळातच पाप पुण्य या विटाळाने भरलेला आहे परंतु त्याचा देखील तु कधीही विचार करत नाही. मग हरिनाम घेण्यासाठी तु जी अखंड सोवळी आहे अशी पृथ्वी तीच्यातही दोष काढतोस येथे अशुद्ध आहे तिथे अशुद्ध आहे कोठेही हरिनाम घे तरी चालेल. तुकाराम महाराज म्हणतात अरे तु ही अखंड सोवळा होण्याकरता आपल्या देहाला काम क्रोधापासून वेगळे कर. तुकाराम महाराज म्हणतात तु तुझ्या देहातील कलाकौशल्य आणि शाब्दिक अभिमान गुंडाळून ठेव म्हणजे तु अखंड सोवळा होशील.
