वाया ऐसा जन्म गेला ।
2724.
वाया ऐसा जन्म गेला । हे विठ्ठला दुःख वाटे ॥१॥
नाही सरता झालो पायी । तुम्ही जई न पुसा ॥धृपद॥
का मी जीतो संवसारी । अद्यापवरी भूमिभार ॥२॥
तुका म्हणे पंढरिनाथा । सबळ व्यथा भवरोग ॥३॥
अर्थ :
हे विठ्ठला माझा मनुष्य जन्म वाया गेला याचे मला दु:ख वाटते. देवा ज्याअर्थी तुम्ही माझ्याशी काही बोलत नाही त्याअर्थी मी तुमच्या पायाशी सरता झालो नाही असे मला वाटते. मी अद्यापही या भूमीला भार होऊन का संसारात जगत आहे ? तुकाराम महाराज म्हणतात, हे पंढरीनाथा माझ्या मागे भवरोगाची सबळ व्यथा लागलेली आहे.
