स्वस्थाना आपण चालिले
17.
स्वस्थाना आपण चालिले जयराम ।
शिष्यांचा संभ्रम फार होता ॥१॥
म्हणती जयराम “आनुष्ठानी तिघे ।
पूर्विल्या प्रसंगे येकनिष्ठ ॥२॥
आंतराय काही आनुष्ठानी राहिल्या ।
गाई या जन्मल्या पुण्यवेषे ॥३॥
हे मुली संपूर्ण आहे आनुष्ठान ।
चित्तशुद्धि जाण ईस आहे” ॥४॥
ऐसे परस्परे बोलती उत्तरे ।
हे कानी सादरे आईकिली ॥५॥
बहेणि म्हणे गेले स्वामी स्वस्थानासी ।
मागील वृत्तांतासी जाण सांगो ॥६॥
