देवो आहे जैसा तैसा न
11.
देवो आहे जैसा तैसा नेणवे सहसा । भांबावला कैसा विश्वजनु ॥
तया रुप ना रेखा लय ना लक्षण । ते प्रतिमेंसी आणुन वासनारुपे ॥
देव सर्वगत निराळा अद्वैत । तया मुर्तीमंत ध्याई जेतु ॥
तिही देवासी आकारु जेथुनि विस्तारु । तो ध्वनी ओंकारु त्या आरुता ॥
तेथे नाद ना बिंदु कळा ना छंदु । अक्षय परमानंदु सदोदितु ॥
अवतरे तैसाच नव्हे होय ते न संभवे । आहे हे आघवे लाघव रया ॥
तो एकवट एकला रचला ना वेचला । आदि अंची संचला अनंतपणे ॥
पृथ्वी आप तेज वायु आकाश । ही सकळही हारपती प्रळयांती ॥
ती निरशुन्य निरुपम निरंजन निर्वाण । ते दशा पाषाण केवी पावती ॥
पाहता या डोळा न दिसे काही केल्या । व्यापुनिया ठेला बाहिजु भीतरी ॥
तो पदपिंडा आतीतु भावाभावविरहितु । बापरखुमादेवीवर विठ्ठलु हृदयांआतु रया ॥
अर्थ :
देव जसा आहे तसा तो कळत नाही. आशी भांबावलेली अवस्था विश्वातील लोकांची झाली आहे. त्याला रुप रेखा नाही कोणतेही लक्षण सांगता येत नाही. जो तो आपल्या इच्छे प्रमाणे त्याला आकारत असतो. तो सर्वगत अद्वैत असा निराळाच आहे त्याला मूर्तीरुप मानुन लोक त्याचे ध्यान करतात. तिन्ही मुख्य देवतांचा एकत्रीत आकार हा त्याचा विस्तार आहे. तोच निराकार ओकांर ध्वनी आहे. त्याच्या ठायी नाद नाही बिंदु नाही कळा नाही छंद नाहीत त्याच्या जवळ अक्षय परमानंद आहे. जसा तो अवतरतो तसा नसतो व जे खरे स्वरुप आहे तेच ते अवतारात नसते. हे लाघव आवे त्या मायेमुळे आहे. तो एकटा आहे ना त्याला कोणी रचला ना कोणी वेचुन आणला. तो सुरवात व शेवट यांच्यात अनंतरुपाने संचला आहे. सर्व पंचमहाभूते त्याच्यात लुप्त होतात. काही नसलेली निरशुन्य अवस्था, ती निरुपम अवस्था, निरंजन अवस्था त्या दशा त्या पाषाण मूर्तीत कशा दिसतील. त्याला पाहायला गेले तर तो दिसत नाही पण तोच अंतरबाह्य व्यापून राहिला आहे. तो पदपिंडाच्या आतील भावाभावविरहित असलेला तो माझ्या हृदयात स्थापित झाला आहे असे माऊली सांगतात.
