तुमच्या कृपामृतजळी ।
503.
तुमच्या कृपामृतजळी ।
माझी वचनवल्ली अंकुरली ।
मती विस्तारे फांकली ।
फळ संभारी हरिनामे ॥१॥
नवल कृपामृतधन ।
वरुषला तुमचे हे वरदान ।
माझी वाचा आणि मन ।
केली पावन कीर्तने ॥२॥
एकट एकलोचि श्रीपती ।
पुरोनि उरलेति त्रिजगती ।
अपूर्व चरित्रे अपूर्व ख्याती ।
संत गर्जती स्वानंदे ॥३॥
शुक सनकादिक नारद ।
व्यास वाल्मीक आणि प्रल्हाद ।
साही शास्त्रे चारी वेद ।
पुराणे पवाडे वर्णिती ॥४॥
परि तुम्ही नकळा त्यांचिये मती ।
अपार म्हणोनिया गुणसंपत्ती ।
जेथिचे तेथेचि भक्त स्तविती ।
अपार म्हणती विस्तारला ॥५॥
सगुण गोकुळी गौळिया घरी ।
निर्गुण योगिया हदयमंदिरी ।
ढिसाळ ब्रम्हांडाबाहेरी ।
महर्षी देव स्तविताती ॥६॥
शिव आपुलिये हदयभुवनी ।
नित्य निमग्न तुमचे ध्यानी ।
भोळया भाविका लागुनी ।
आवडी ऐसे रुप धरी ॥७॥
कामिनीभावे कांतातुर ।
मदनमूर्ति मनोहर ।
वैरसंबंधी कंसचाणेर ।
तया तैसाचि ते ठायी ॥८॥
गोवळांमाजी गाईपाठी ।
वानरांमाजी मेळवुनी थाटी ।
रावणनि:पातनी परम हटी ।
आतुबर्ळी कळिकाळा ॥९॥
नित्य नूतन तुमचे गुण ।
चरित्रे गाती वैष्णव जन ।
निळा झाला सुखसंपन्न ।
चरणी मन ठेविता ॥१०॥
