तपे दान व्रते यज्ञाच
669.
तपे दान व्रते यज्ञाचिया कोडी | तुकिता जाळी थोकडी हरिनामे ॥१॥
न पुरे त्यासी घातली त्रिभुवनीची तीर्थे | नयेची पुरते रामनामेसी ॥२॥
नाही या जीवाचे बोलणे शिवाचे | उपदेशिले वाचे शक्तिप्रती ॥३॥
नाम नाही वाचे हाचि पै निषेधु | विधी हा गोविंदु स्मरलिया ॥४॥
श्रेष्ठ सर्व नाम शिवाचे बोलणे | युक्ती अनुमाने न बोले काही ॥५॥
नामेचि भक्त ते पावले अपार | नामे पतित नर उद्धरले ॥६॥
नामे पशु गजेंद्राचा तो उद्धार | वाल्मिके विचार हाचि केला ॥७॥
गगनी धुरू केला अढळ नामे देखा | नामेचि गणिका उद्धरली ॥८॥
नामे ते आपदा न बाधी प्रल्हादा | मुखी नाम सदा उच्चारिता ॥९॥
कृपाळू नाम पै मेघ हाचि सार | भीष्मे युधिष्ठिरा उपदेशिले ॥१०॥
हरिनामा परते नाही विचारिता | नवमाध्यायी गीता कृष्ण सांगे ॥११॥
सकल अमृत श्रीहरीचे नाम | त्यामाजी उत्तम रामनाम ॥१२॥
म्हणोनी सदाशिवे धरिले मानसी | हेचि गिरिजेसी उपदेशिले ॥१३॥
तारक ब्रह्ममंत्र रामनाम जाण | विश्वनाथ श्रवण करितसे ॥१४॥
कीर्तन श्रवण हेचि पै हो काशी | म्हणोनी मानसी राम जपा ॥१५॥
विरंची सकळ शास्त्र विचारिता | हरिनामापरता मंत्र नाही ॥१६॥
कळिकाळा त्रास हरीनाम कीर्तने | पतितपावन प्राणी होय ॥१७॥
कलियुगी धर्म हरीचे हे नाम | म्हणोन शुकदेवे वाखाणिले ॥१८॥
नामयाचा स्वामी पंढरीचा रावो | रखुमाईचा ताहो गाऊ गीती ॥१९॥
