आनंदले वैष्णव गर्जती
711.
आनंदले वैष्णव गर्जती नामे ।
चौदाही भुवने भरली परब्रहे ॥१॥
नरहरि हरि हरि नारायणा ।
सनकसनंद मुनिजनवंदना ॥२॥
गाता वाता नाचता प्रेमे उल्हासे ।
चराचरीचे दोष नासिले अनायासे ॥३॥
हरि मनी हरि चित्ती हरि अंक शरीरी ।
तयाते देखोनी हरि चाऱ्ही बाह्या पसरी ॥४॥
अंघ्रिरेणु ज्याचा उद्धरितो पतिता ।
प्राकृत वाणी केवी वर्णू हरिभक्ता ॥५॥
तीर्थी पावन धर्म जिही केला धडौती ।
कैवल्यकल्पद्रुम ते त्रिजगती ॥६॥
मत्स्य कूर्मादिक ज्याचे महिमेसी आले ।
धन्य वैष्णव तेज रवि शशीसी पाहाले ॥७॥
बापरखुमादेविवरा पढियंती जया तनु ।
तया संताचरणी स्थिर हो का मनु ॥८॥
अर्थ :
ज्याला सनक सनंदन वगैरे मुनी वंदन करतात. तो जो चवदाही भुवनांमध्ये परिपूर्ण भरला आहे. अशा परमात्म्याच्या हरि, नारायण, नरहरि, वगैरे नामाचा घोष वैष्णव आनंदाने करतात. या त्यांच्या प्रेमाच्या व आनंदाच्या गाण्यांने, नाचण्यांने, चराचरीचे दोष सहज नाहीसे होतात. वैष्णवांच्या मनांत हरि, चित्तात हरि, अंगावर माळा मुद्रादि हरिचीच चिन्हे धारण केली आहे. अशा लोकांना पाहून त्यांना अलिंगन देण्याकरता देव चारी हात पसरतो. ज्या हरिभक्तांच्या पायांच्या धुलीकणाने पापी लोक उद्धरून जातात. अशा भक्तांचे वर्णन मला प्राकृत वाणीने कसे करता येईल. ज्यांनी तीर्थात स्नान केले असता तीर्थेदेखील पावन होतात. ज्यांच्या योगाने धर्माला पूर्णपणा प्राप्त होतो. एवढेच नव्हे तर ते या त्रिभुवनांतील मोक्ष देणारे कल्पवृक्षच होत. ज्यांच्या रक्षणाकरिता परमात्म्याला मत्स्य कूर्म वगैरे अवतार घ्यावे लागले. त्याच्या तेजाची स्तुती काय करावी. त्यांनी चंद्र सूर्यालाही लाजविले. ज्या संताच्या विभूति माझे पिता व रखुमाईचे पती श्रीविठ्ठल यांना आवडतात. त्यांच्या पायी माझे चित्त स्थिर होवो असे माऊली सांगतात.
