वोजावलिया वोढी ।
234.
वोजावलिया वोढी ।
वोढी पाडीजे ते नाही ।
ऐसे विचारुनी पांही ।
आपुले मनी ।
मग राहिजे सुतत्व निर्वाणी ॥
दुर्लभ दुर्लभ संसार ।
त्यात दुर्लभ मानुसपण ।
ये जन्मी नोळखसी ।
पशु होऊनि जन्मसी ।
मग तुज सांगेल कवण रया ॥
जव देही आहे देवो ।
तव या देहे त्याच्या लाहो ।
मग तुज रात्री जाईल जड भारी ? ।
बापरखुमादेविवरु ।
विठोजी पंढरपूरी ।
तो ओळगे ओळगे जन्मवरी ॥
अर्थ :
परमात्म स्वरुपाचे प्राप्ती करिता ओढ घेतली तर संसारातल्या वोढीप्रमाणे ती दुःखात पाडीत नाही. असे मनाला सांग मोक्षरुप तत्वाच्या ठिकाणी आनंदाने राहा. या संसारात मनुष्य देह प्राप्त होणे अत्यंत दुर्लभ आहे. त्यातही मनुष्यपणा फार दुर्लभ आहे. अशा मनुष्य जन्मांत परत्म्याला ओळखून घेतले नाहीस तर पुढच्या जन्मी पशुच्या योनीला तुल जावे लागेल. त्याठिकाणी तुला आत्मज्ञानाचा उपदेश कोण करणार. अरे, बाबा जोपर्यंत तू या मनुष्य देहांत आहेस. तोपर्यंतच मनाला परमात्म चिंतनाची गोडी लावून त्याची प्राप्ती करुन घे. नाही तर मनुष्य देह गेल्यावर तुलाही अज्ञान रात्र उलंघन करणे फार जड जाईल. येवढयाकरिता माझे पिताव रखुमादेवीचे पती जो श्री विठ्ठल त्यांचा जन्मभर अनन्य भावाने उपासना कर असे माऊली सांगतात.
