धन्य हा खेचर धन्य हा
166.
धन्य हा खेचर धन्य हा सोपान । भक्तीचे जीवन जनक हेतु ॥१॥
धन्य याचे कूळ पवित्र कुशळ । नित्य या गोपाळ जवळी असे ॥२॥
याचेनि स्मरणे नासती दारुणे । कैवल्य पावणे ब्रह्मामाजी ॥३॥
निवृत्ति म्हणे परब्रह्म हे साकार । तेथील अंकूर उमटले ॥४॥
अर्थ:
सतत केलेल्या भक्ती मुळे त्या भक्तीचे जनकत्वच प्राप्त करुन कृतकृत्य झालेले सोपानदेव व विसोबा खेचर आहेत. ज्यांच्या जवळ तो गोपाळ नामरुपाने सतत असतो त्याचे कुळ पवित्र व कुशळ असते. या संतांचे जे सतत चिंतन करतात त्यांचे दारुण पाप नष्ट होते व ते भगवंताच्या कैवल्यास प्राप्त होतात. निवृतिनाथ म्हणतात, हे संत म्हणजे त्या सगुण साकार परब्रह्माचे अंकुर आहेत.
