कोण सुख धरोनि संसारी
4033.
कोण सुख धरोनि संसारी । राहो सांग मज बा हरी । अवघ्या नाशिवंता परी । थिता दुरी अंतरसी ॥१॥
प्रथम केला गर्भीवास । काय ते सांगावे सायास । दुःख भोगिले नव ही मास । आलो जन्मास येथवरी ॥२॥
बाळपण गेले नेणता । तारुण्यदशे विषयव्यथा । वृद्धपणी प्रवर्तली चिंता । मरे मागुता जन्म धरी ॥३॥
क्षण एक तो ही नाही विसावा । लक्ष चौऱ्यांशी घेतल्या धावा ।
भोवंडिती पाठी लागल्या हावा । लागो आगी नावा माझ्या मीपणा ॥४॥
आता पुरे ऐसी भरोवरी । रंक होऊनि राहेन द्वारी । तुझा दास मी दीन कामारी । तुका म्हणे करी कृपा आता ॥५॥
अर्थ :
हे हरी संसारामध्ये कोणत्या प्रकारचे सुख धरुन मी राहू ते तू मला सांग. येथील सर्व नाशवंतासाठी, जवळ तू सत्य आहेस त्यामुळे यांच्या नादी लागलो तर तू देखील अंतरला जातोस. प्रथम मातेच्या गर्भामध्ये वास केला आणि तेथील कष्ट तर तुला काय सांगावे ? तेथील नऊ महिने दु:ख भोगले आणि येथे जन्माला आलो. बालपण हे अज्ञानपणातच गेले आणि तारुण्यदशेत असतांना विषय व्यथेमध्येच मी गुंतलो. वृध्दपणी संसाराची मुलाबाळांची, नातवंडाची, व्यवसायाची चिंता उत्पन्न झाली नंतर मेलो आणि मेलो त्यानंतर पुन्हा जन्माला आलो. अशा प्रकारे एक क्षणदेखील विसावा मिळाला नाही परंतू चौ-यांशी लक्ष योनीच्या धावा घेतच राहीलो. विषयाची हाव माझ्या पाठीमागेच लागलेली आहे ती मला सारखी फिरविते आहे माझ्या देहाभिमानाला आणि मीपणाला आग लागो. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आता ही उठाठेव खूप झाली मी तुझ्या दारामध्ये रंक होऊन दरीद्री होऊन राहीन. देवा मी तुझा काम करणारा दीन दास आहे त्यामुळे तू आता माझ्यावर कृपा करावी.
