तुमच्या कीर्तने पावल
19.
तुमच्या कीर्तने पावलो पार।
भवसिंधूचा लहान थोर।
पशुपक्षी दैत्य निशाचर।
नारीनर बाळके ॥१॥
पुण्यपावन तुमची कथा।
एकाक्षर श्रवणी पडता।
झाडा करुनिया दोषा दुरिता।
कलिमल तत्वता विध्वंसती ॥२॥
हरिनामाच्या घोष गजरी।
ध्वनि रिघताचि कर्णविवरी।
भितरील पातकांचिया हारी।
दिशा लंघोनि पळताती ॥३॥
आनंदासि उणेंचि नाही।
कोंदोनि ठाके अंतर्बाही।
नाना चरित्रांची नवाई।
श्रोते ऐकोनि संतोषती ॥४॥
गिरी उचलिला गोवर्धन।
निजमुखे प्रासिला हुताशन।
काळिया आणिला नाथून।
मिसे जाऊन चेंडूवाच्या ॥५॥
वत्से गोवळे चतुरानने।
नेता अवघी आपणचि होणे।
स्तनी लाविता पूतनाशोषणे।
केली विंदाने अघटित ॥६॥
परता सारुनिया सागर।
माजी रचिले व्दारकापूर।
निद्रा न मोडिता नारीनर।
मथुरा नेऊन सांठविली ॥७॥
काळयवनासि ठकिले कैसे।
मुचकुंदावरी नेला पळत्या मिसे।
जाळूनि त्याचे केले कोळसे।
आपण निराळा साक्षपणे ॥८॥
भाजीदेठे तृप्त होणे।
पांडवा नेणता ऋषिभोजने।
परीक्षितीसी गर्भीचि रक्षणे।
अपूर्व विंदाने श्रीहरीची ॥९॥
यशोदेचे स्तनपान करीत।
नंदा कडिये विराज तेथ।
गोपिकांचे मनोरथ।
पूर्ण करित रासक्रीडे ॥१०॥
गौळणी रंजवी नानापरी।
दही दूध लोणी त्यांचे चोरी।
उणे पडता त्यांचिये घरी।
अधिकचि करी वाढूनिया ॥११॥
गायींमागे धावे रानी।
घोंगडे काठी पावा घेउनी।
नानापरीची खेळे खेळणी।
लीलाविग्रही अवतारी ॥१२॥
ऐशी अगाध दिव्य चरित्रे।
गाती ऐकती त्यांची गात्रे।
अवघी होऊनिया पवित्रे।
जाती वैकुंठा निळा म्हणे ॥१३॥
