शुकादिकाचिये ह्रदयी
179.
शुकादिकाचिये ह्रदयी ध्यान ।
आम्हा जोडले वो न करिता साधन ।
सहजचि पाचारिता येतसे धावोन ।
प्रेमे आलिंगिता निवे तनु मन वो ॥१॥
ऐशा गौळणी आनंद भरिता ।
दृष्टी अवलोकूनि मदनचिया ताता ।
म्हणती धन्या भाग्य आमुचे वो आता ।
लाधलो जन्म झाली कृताचि कृत्यता वो ॥२॥
नित्य हरीचिया समागमे बाई ।
नाही देखिले ते सुख भोगू देही ।
प्रारब्ध संचित क्रियमाण तेही ।
गेले हारपोनिया ॥ ठांईचे ठांई वो ॥३॥
येता जाता नेणो काळाचा आडदरा ।
देखता सन्मुख तो पळतुसे माघारा ।
रंग श्रीरंगाचा उमटला शरीरा ।
तेणे वाहातात जन्मदु:ख जीर वो ॥४॥
हरीचे सन्निधीं वो सहवासे वर्तता ।
यासि बोलता चालता कृष्ण खेळता ।
आंगी ऐश्वर्याचा दृढावली सत्ता ।
तेणे अजरामर झालो असो निभ्रांता वो ॥५॥
ऐशा कृष्णरुपी रुपसा बाळा ।
होऊनि स्तविती पूजिती वेळोवेळा ।
कडिये खांदिये घेऊनि घननीळा ।
निळया स्वामीते अवलोकिती डोळा वो ॥६॥
