स्वरुप सुंदर अति विश
957.
स्वरुप सुंदर अति विशाळ । नेत्री निघती अग्निज्वाळ । हृदयावरी सर्पाची माळ । दुष्ट दुर्जना प्रत्यक्ष काळ ॥१॥
वाचे वदे हरहर शब्द । तेणे निरसे भवबंध ॥धृ.॥
माथा जटा शोभे पिंगटवर्ण । मध्ये गंगा वाहे परिपुर्ण । हृदयी सदा रामध्यान । तयासी पाहता निवे मन ॥२॥
शिव शिव नाम हे तारक । जया ध्याती ब्रह्मादिक । सिद्ध साधक वानिती अनेक । तया ध्याता सुख अलोकिक ॥३॥
वामांगी गौरी सुंदर । तेजे लोपतसें दिनकर । ह्रुदयीं ध्याता परात्पर । एका जनार्दन तुटे विरझार ॥४॥
