दीन आणि दुर्बळांसी ।
2797.
दीन आणि दुर्बळांसी । सुखरासी हरीकथा ॥१॥
तारू भवसागरींचे । उंचनीच अधिकारी ॥धृपद॥
चरित्र ते उच्चारावे । केले देवे गोकुळी ॥२॥
तुका म्हणे आवडी धरी । कृपा करी म्हणऊनी ॥३॥
अर्थ :
जे दीन आणि दुर्बळ आहेत त्यांच्यासाठी हरीकथा म्हणजे सुखाची राशीच आहे. ही हरीकथा भवसागर तरुन नेणारी नौकाच आहे जहाजच आहे त्यामध्ये उच्च असो किंवा नीच असो सर्वांना बसण्याचा अधिकार आहे. या हरीकथेमध्ये भगवान श्रीकृष्णाने गोकुळामध्ये जे चरित्र केले आहे तेच उच्चारावे म्हणजे लोकांना सांगावे. तुकाराम महाराज म्हणतात, हरीकथा करणे किंवा ऐकणे याविषयी आवड धरल्याने देव आपल्यावर कृपा करतो त्यामुळे हरीकथेविषयी मनात आवड धरावी.
