गाइलेचि गाता गीती ।
497.
गाइलेचि गाता गीती ।
पवाडे तुमचेचि श्रीपती ।
सहसा धणी न पुरे चित्ती ।
सरिता रातिदिवस युगे ॥१॥
अनंता युगी अनंत खेळ ।
अनंता नामा रुपांचे मेळ ।
अनंत संपादिले जे निर्मळ ।
पढता वाचे उल्हासु ॥२॥
क्षीराब्धिशयन वैकुंठवास ।
अमरावती सत्यलोक कैलास ।
अष्टहि दिक्पाळाचे वेष ।
भरले सावकाश निजात्मरुपे ॥३॥
मच्छ कच्छ वराह रुपे ।
नृसिंह वामन परशुराम प्रतापे ।
राम कृष्ण बौध्यादि अमूपे ।
मिरविली स्वरुपे क्षुल्लकादि ॥४॥
नाना स्वर्गं सृष्टीरचना ।
नाना ऋषीरुपे वसवूनि स्थना ।
नाना संतरुपा नारायणा ।
निळा विज्ञापना करी तुमची ॥५॥
