काय नाही माझे अंतरी
2563.
काय नाही माझे अंतरी वसति । व्यापक हा भूती सकळा नांदे ॥१॥
चित्तासी प्रसाद होईल चळण । तेचि ते वळण मनासही ॥धृपद॥
सर्व शिक्त जीवी राहिल्या कुंटित । नाही केले होत आपुले ते ॥२॥
तुका म्हणे दोरी खांब सूत्र्या हाती । नाचवी नाचती जडे तैसी ॥३॥
अर्थ :
जो हरी सर्वत्र व्यापक आहे सर्व भूत मात्रांमध्ये नांदतो तो माझ्या अंतःकरणात नाही काय? त्याचा जसा प्रसाद मिळेल तसेच माझ्या मनाला वळण लागेल व माझ्या मनालाही तसेच वळण लागेल. माझ्या सर्व शक्ती जीवाशी कुंठित होऊन राहिल्या आहेत त्यामुळे मी स्वतः काही केले तरी ते होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात कळसूत्री बाहुल्यांची दोरी जशी दुसऱ्याच्या हातात असते त्याप्रमाणे या देहरूपी बाहुल्याची दोरी देवाच्या हातात आहे आणि तो या जिवाला जसे नाचवील तसे हा जीव नाचत असतो.
