जया दोषा परिहार । ना
16.
जया दोषा परिहार । नाही धुंडिता शास्त्र ।
ते हरती अपार । पंढरपूर देखिलिया ॥१॥
धन्य धन्य भीमातीर । चंद्रभागा सरोवर ।
पद्मतीर्थी विठ्ठल वीर । क्रीडास्थळ वेणुनाद ॥२॥
सकळ तीर्थांचे माहेर । भूवैकुंठ निर्विकार ।
होतो नामाचा गजर । असुरकाळ कांपती ॥३॥
नाही उपमा द्यावया । समतुल्य आणिका ठाया ।
धन्य भाग्य जया । जे पंढरपूर देखती ॥४॥
उपजोनी संसारी । एक वेळ पाहे पा पंढरी ।
महादोषा कैची उरी । देवभक्त देखिलिया ॥५॥
ऐसी विष्णुची नगरी । चतुर्भुज नरनारी ।
सुदर्शन घरटी करी । रीघ न पुरे कळिकाळा ॥६॥
ते सुख वर्णावया गति । एवढी कैची मज मति ।
जे पंढरपुरा जाती । ते पावती वैकुंठ ॥७॥
तुका म्हणे या शब्दाचा । जया विश्वास नाही साचा ।
तो अधम जन्मांतरींचा । जया पंढरी नावडे ॥८॥
