प्रीतीचा कलहे पदरासी
2165.
प्रीतीचा कलहे पदरासी घाली पीळ । सरो नेदी बाळ मागे पुढे पित्यासी ॥१॥
काय लागे त्यासी बळ हेडाविता कोण काळ । गोविते सकळ जाळी स्नेहसूत्राची ॥धृपद॥
सलगी दिला लाड बोले ते ते वाटे गोड । करी बुझावोनि कोड हाती देऊनि भातुके ॥२॥
तुका म्हणे बोल कोणा हे का नेणा नारायणा । सलगीच्या वचना कैचे उपजे विषम।
॥ ४॥
अर्थ :
लहान मूल आपल्या बापाच्या धोतराला धरते आणि त्याला पीळ घालून तेथेच उभा राहते. मग ते बाळ आपल्या बापाला मागेही होऊ देत नाही पुढे होऊ देत नाही. त्या मुलाकडून तो धोतराचा पदर सोडून घेण्यास त्या बापाला काही ताकत लागणार आहे काय आणि किती वेळ लागेल? परंतु तो बाप मुलाच्या स्नेह रुपी तंतूच्या जाळ्यात गुंतलेला असतो. कारण तो बाप त्या मुलाच्या स्नेहात गुंतलेला असतो आणि त्यामुळे तो त्याला हवे तसे लाड देतो मग त्या मुलाने काहीही करो बरोबर अथवा चुकीचे कसेहि असो त्या बापाला गोड वाटते. मग तो मुलगा हट्ट करू लागतो आणि त्याचा हट्ट बापा पुढे मांडतो मग तो बाप त्याला काहीतरी खाऊ देऊन त्याची समजूत काढतो. तुकाराम महाराज म्हणतात हे नारायणा मी आता जे काही बोलत आहे ते कोणाला बोलत आहे? का बोलत आहे? कशाकरता बोलत आहे? हे काय तुम्हाला कळत नाही काय? हे नारायणा मी हे सर्व तुम्हालाच बोलत आहे कारण मी तुमचा लाडका मुलगा आणि तुम्ही माझे कौतुक पुरवणारे बाप आहात मग मी जरी काही बोललो तर तुम्हाला त्याचा राग तरी कसा येईल?
