चहु शून्याचा भेद कैस
345.
चहु शून्याचा भेद कैसा पहावा देही ।
ब्रह्मरंध्री नि:संदेही निजवस्तू ॥
सांवळे सकुमार बिंदुचे अंतरी ।
अर्धमात्रे वरी विस्तारले ॥
त्रिकुट श्रीहाट गोल्हाट तिसरे ।
औठपीठादि सारे ब्रह्मांडासी ॥
स्थूल सूक्ष्म कारणी माया ।
महाकारणाच्या ठाया रीघ करा ॥
निवृत्ति ज्ञानदेव उभयतांचे बोल ।
आकाश बुबुळी पाहा असे ॥॥
अर्थ :
या देहातच असून चारी अवस्थांचा खोटेपणा कसा ओळखावा?
ब्रह्मरंधात ती ब्रह्मवस्तु कशी पाहावी. ब्रह्मरंधातील त्या सूक्ष्म बिंदूतील अर्थमात्रेत ती सांवळी सुकुमार मूर्ति आहे त्रिकूट, श्रीहाट, गोल्हाट व औटपीठ ही महाकारणातील स्थाने आहेत योगाभ्यासाने स्थूल, सूक्ष्म व कारण या मायिक देहांचा निरास करून महाकारणात प्रवेश करता येतो. माझे व निवृत्तिरायांचे शब्दही वरिल अर्थाचेच आहेत. हे विचार करून पहा असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
