दुधावरली साय निवडुनी
608.
दुधावरली साय निवडुनी दिधली ।
तैसी परी जाली आम्हा तुम्हा ॥१॥
घालोनी ब्रह्मे उद्गार संभ्रमे ।
अनुदिनी प्रेमे डुल्लतसे ॥२॥
नाठवे आशा देहावरी उदास ।
मीतूंपण भास चोजवेना ॥३॥
रखुमादेविवर विठ्ठली मुरोनी राहिला ।
तो आनंदु देखिला संतजनी ॥४॥
अर्थ :
दुधांमध्ये सारभूत जसी साय असते. व ती काढून जसी हातावर द्यावी त्या प्रमाणे सर्व संसारात सारभूत जो परमात्मा त्याची प्राप्ती आज आपल्याला झाली आहे. परमात्मस्वरुपाने तृप्त होऊन कृत्यकृत्यतेचे उदगार तोडांतून निघतात. आम्ही रात्रंदिवस त्या प्रेमांत डोलत आहोत. अशा स्थितीत आशेचा आठवच नाही. देहावर उदासीनता येते. आणि मी, तू पणाचा द्वैतभाव जाणवत नाही. रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांच्या आनंदात आम्ही कसे डोलत आहोत हे एक, साधुसंतानाच माहित आहे. असे माऊली सांगतात.
