तत्त्वमस्यादि वाक्य
138.
तत्त्वमस्यादि वाक्य उपदेश । नामाचा अर्धांश नाही तेथे ।
म्हणोनी नामसंकीर्तन करिता । जवळी जोडलासि आता ।
क्षणु भरी न विसंबे । जिवाचिया जीवना रया ॥
नाम निजधीर गर्जती वैष्णव वीर । कळीकाळ यमाचे भार । पळाले तेथे ॥
म्हणोनी नाम वज्रकवच । तोचि निर्गुणाचा अभ्यास । पाहे पा स्वये प्रकाश विचारुनी ॥
ऐसे सुंदर रूपडे हदयी धरिले आता । पाहता केवी होये पूर्ण योनि रया ॥
ऐसा सकळा अकळा कळला । हृदयी धरिला समताबुध्दी ।
बापरखुमादेविवरु विठ्ठलु चिंतिता । तुटली जन्माची आधिव्याधी रया ॥
अर्थ :
तत्वमसी ह्या महावाक्याचे फल ही नामफलाच्यापेक्षा अर्धेच असते. म्हणुन हे जीवीच्या जीवना आता क्षणभर ही न विसंबता नामसंकिर्तनाला जवळ जोडत आहे. मोठे धैर्यवान वैष्णववीर नामघोषाची गर्जना करत असतात. त्यामुळे घाबरुन कळीकाळ असलेले यमदुत ही तेथुन पळत सुटतात. त्या नामाच्या वज्रकवचाच्या सुरक्षेमुळे निर्गुणाचा अभ्यास व स्वप्रकाशरुप आत्मज्ञान ही तपासता येते. असे ते सुंदर रुप मनात धरले तर परत जन्म कसा येईल? असे ते माझे पिता व रखुमाईचे पती जे इतर कोणत्याही साधनाने कळत नाहीत. त्यांना समताबुध्दीने हृदयी धरल्यामुळे माझी जन्ममरणाची आधीव्याधी समुळ तुटुन गेली असे माऊली सांगतात.
