मानसींच ध्यान मानसीं
2511.
मानसींच ध्यान मानसींच स्नान । मानसींच अर्चन करु आम्ही ॥१॥
न करु साधन लौकिकापुरतें । न पुजूं दैवत आन वाया ॥२॥
मानसेंच तप मानसेंच जप । मानसी पुण्यपाप नाही आम्हा ॥३॥
मानसी तीर्थयात्रा मानसी अनुष्ठान । मानसें धरूं ध्यान जनार्दन ॥४॥
एका जनार्दनी मानसी समाधी । सहज तेणे उपाधि निरसली ॥५॥
