(सौरी, स्वैरिणी)
3962.
(सौरी, स्वैरिणी)
टाक रुका चाल रांडे का गे केली गोवी । पुसोनिया आले ठाव म्हणोनि देते सिवी ॥१॥
आता येणे छंदे नाचो विनोदे । नाही या गोविंदे माझे मजसी केले ॥धृपद॥
कोरडे ते बोल का गे वेचितेसी वाया । वर्ते करूनि दावी तुझ्या मुळीचिया ठाया ॥२॥
याजसाठी डौर म्या धरियेला हाती । तुका म्हणे तुम्हा गाठी सोडायाची खंती ॥३॥
अर्थ :
संतरुपी सौरी संसाररुपी सौरीला म्हणते, अग रांडे तू तर देहाभिमान टाकून दे का बरे त्यात व्यर्थ गुंतली आहे मी त्या ठिकाणावरुन बाहेर आले आहे म्हणूनच तर तुला शिव्या देत आहे. चल आता आपण भजनाच्या छंदामध्ये नाचूया गोविंदाने मला त्याच्यासारखेच, त्याच्या स्वरुपासारखेच केले आहे. अग तू भक्ति, ज्ञान, वैराग्या वाचून व्यर्थ कोडे बोल का बोलते आहेस बरे जसे बोलते तसे वर्तन करुन तुझ्या मूळ स्वरुपाची प्राप्ती तू करुन घ्यावी. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही देहाभिमाना विषयीच्या गाठी आणि त्याविषयीची खंत सोडावी यासाठीच आम्ही उपदेशरुपी डमरु हातात धरला आहे.
