वर्ण ना व्यक्ति अमुप
561.
वर्ण ना व्यक्ति अमुप निजतेज ।
संतांचे ते गूज आत्मरुप ॥१॥
मुक्ताचा सागर भरिंत दाहि दिशा ।
पाही जीवदशा बुडुनि जाय ॥२॥
ते खूण दाविली माझिया नयनी ।
चिदरत्नाची खाणी उघडली ॥३॥
निवृत्तिप्रसादे ज्ञानदेव लाधला ।
सुखिया हो झाला तेणे सुखे ॥४॥
अर्थ :
आत्मस्वरुपाला वर्ण नाही, रुप नाही पण ते अत्यंत तेजोरुप आहे ही संतांची गुह्य गोष्ट होय. ज्याच्या प्राप्तीने जीवदशा नाहीशी होऊन सर्व दिशा मुक्त पुरुषाच्या बोधाने भरुन जातात. व जीवदशा नाहीशी होते. ते आत्मस्वरुप मला दाखवून ज्ञानमय रत्नांची खाण मला उघडून दिली. हे स्वरुप मला निवृत्तीरायांच्या कृपेने प्राप्त झाले व मी त्या योगाने पूर्ण सुखी झालो. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
