आलियाचा संतोष गेलिया
196.
आलियाचा संतोष गेलियाची हानी ।
नाही त्या अतिशो वेंचे त्याची कहाणी ।
ऐसे संकल्प विकल्प देही वरीवरी ।
मुंडिलिया होईल कायी ।
तरी बहुरुप्याच्या ठाई काई नटु नसे रया ॥
आधी भीतरी दंडावा पाठी बाहीजु मुडांवा ।
नाही तरी योग भांडिवा का करिसी रया ।
मागितलीया भिक जरी होय निर्दोष ।
तरी सणिये रजक काय न मागती ।
देवपणे फुग धरिसील गाढा ।
तरी वायांवीण मूढा सिंतरलासी ॥
थिगळी घालोनिया गळा ।
म्हणसी न भिये कळिकाळा ।
तरी काय कर्मा वेगळा के हो पहासी ।
योगिया म्हणिजे कैसा । भीतरी कास्मिरू जैसा ।
मीनलिया पदार्थासरिसा होऊनि मिळे ॥
हृदय नाही जालेपण क्रोधे भवंडिसी लोचन ।
अंगी भस्मउधळण राख राखिल काई ।
खरू लोळे उकरडा काय परत्राचिया चाडा ।
तैसा मठ बांधोनि मूढा । वर्म चुकलासी ॥
तीर्थ व्रत जपस्नान । वाउगे करिसी ध्यान ।
ऐसे करिता आने आन मार्ग चुकलासी ।
शुद्ध करूनिया मन सेवी निवृत्तीचे चरण ।
विठ्ठल विठ्ठल म्हण नाही तरी नाडलासी ॥
अर्थ :
मिळाले तर संतोष व गेले तर हानी वाटते. नाही त्याची हाव व खर्च केल्याच्या कहाण्या ऐकवुन असे संकल्प विकल्प मनात बाळगुन वरवर मुंडण केले तर ते नट व बहुरुप्याने काढलेल्या सोंगा सारखे आहे. पहिले अंतरातील वासना दंडाव्या व मग बाहेर मुंडण करावे तसे केले नाही तर संन्यासाश्रमाची विटंबना होईल. भिक मागुन निर्दोष होता येते तर सणादिवशी भिक मागणारे परिट निर्दोष झाले नसते का? संन्यास वस्त्रामुळे लोकांनी केलेल्या पूजेमुळे जर फुगुन गेलास तर उगाच फसशील. गळ्यात कफनी घालुन म्हणशील मी कळिकाळाला भित नाही. तरी मागिल संचित कर्मे कुठे जाळशील. तो योगी स्पटिका सारखाआतबाहेर स्वच्छ असतो. व ज्या पदार्थात मिळेल त्याच्या सारखा दिसतो. त्या स्पटिका सारखा आत मध्ये न होता जर डोळे वटारशील. तेंव्हा ती अंगावर लावलेली राख तुझे रक्षण करिल काय? गाढव उकिरड्यावर काय दुसऱ्याच्या इच्छेने लोळते का? मठ बांधुन त्या मठात अडकल्याने वर्म चुकलास. वाऊगेपणे तीर्थ, व्रत व तप केलेस तर नक्कीच मार्ग चुकशील. श्री गुरु निवृत्तिनाथ चरणांचा आश्रय करुन सतत विठ्ठल नामात रत राहिला नाही तर संसाराकडुन नाडला जाशील असे माऊली सांगतात.
