उन्मनी संयोगे गोसावी
370.
उन्मनी संयोगे गोसावी विराजे ।
चंहू देहांचे ओझे निवारोनी ॥१॥
सोहंमस्मीचे छंदे परिपूर्ण ।
विज्ञान हे खूण जेथे नाही ॥२॥
चंद्र सूर्याहूनी तेज ते आगळे ।
अव्यक्ते व्यापिले अनुभवे ॥३॥
अनुभवाची खूण गुरूगम्य जाणती ।
ज्ञानदेवे विनंति हेचि केली ॥४॥
अर्थ :
स्थूल, सूक्ष्म, कारण व महाकारण याचारी देहांचा निरास करून योगी मनपणालाही विसरून, तो योगी उन्मनीच्या अवस्थेत विराजमान होतो. व सच्चिद ब्रह्म मी आहे अशा अपरोक्ष ज्ञानाचा लाभ घेता. ते ब्रह्म चंद्र व सुर्याहुन तेजस्वी आहे. त्या अव्यक्त परमात्म्याने सर्व व्यक्त विश्व अनुभवाने जाणल्या सारखे आहे. ही अनुभवाची खूण गुरूगम्य होतो असे माऊली सांगतात.
