मग जाला स्वयपाक स्ना
941.
मग जाला स्वयपाक स्नानविधि सारा | सकळा हांकारा जाणबिला ॥१॥
आले महाद्वारी दिधली आसने | पूजा नारायणे आरंभिली ॥२॥
तंव ठकलो म्हणती देव पहा हो कैसे जाले | सर्व सुख नेले इही भक्ती ॥॥३॥
रत्नजडित पाट सत्वरी आणिले | वरी द्विज वसविले पृथक्कारे ॥४॥
प्रक्षाळोनि चरण पुसिले पीतांबरे | मस्तकी आदरे तीर्थ वंदी ॥५॥
कस्तुरीचे टिळे दिव्य चंदन उटी | घातलिया कंठी तुळशीमाळा ॥६॥
दशांग धूप रत्नांचा दीपक | ओवाळी नायक वैकूंठींचा ॥७॥
दोही बाही पंक्ति मांडिल्या देव्हडी | राही रुक्माई परवडी वाढितसे ॥८॥
चतुर्विध अन्ने आथिली बहुगुणे | षड्रस पक्वान्ने सर्वांठायी ॥९॥
मग संकल्प सोडिला नामयाचे कंरे | भक्त जयजयकारे गर्जिन्नले ॥१०॥
भोक्ता नारायण लक्ष्मीचा पती | म्हणोनि प्राणाहुती घेतल्या वेगी ॥११॥
भर्ता भोक्ता कर्ता करविता आपण | सहज तेथे पूर्ण सकळ काम ॥१२॥
विष्वंभर कृपादृष्टि न्याहाळीत | प्रार्थना करीत ब्राह्मणांची ॥१३॥
देखोनि ते समृद्धि हरिखले द्विज | जाले नवल चौज पहा कैसे ॥१४॥
कोण हा गृहस्थु केव्हा भाग्यवंतु | नेणवे अद्भुतु महिमा याचा ॥१५॥
ऐसे जेविले आनंदे धाले परमानंदे | मुखशुद्धि गोविंदे दिधली करी ॥१६॥
कर्पूरेसहित समर्पिले विडे | कर जोडोनी पुढे विनवीतसे ॥१७॥
ऐसा भक्तजन कृपाळू दीनाचा दयाळु | आनंदे गोपाळू उभा असे ॥१८॥
तया नामदेवे भुलविले लोभे | वेडावले उभे चिदानंद ॥१९॥
