चोहटा मिष्टान्न जे क
532.
चोहटा मिष्टान्न जे काही सांडले ।
सुनियासी झाले सुकाळ पै ॥१॥
तैसा तो अभक्त वाढिन्नला जगी ।
काळ तयालागी ग्रासितसे ॥२॥
जे का पारंगत श्रेष्ठ भागवत ।
चळचळा कापंत काळ तया ॥३॥
तयाचिया दृष्टी मोहरा न राहे ।
धाऊनिया जाय अज्ञान ती ॥४॥
निवृत्तीदासाचा झालो निजदास ।
वंदिती तयास ब्रह्मादिक ॥५॥
अर्थ :
चव्हाट्यावर टाकलेल्या मिष्टानाचा कुत्र्यांना सुकाळ होतो. त्याप्रमाणे जगामध्ये भगवद्भक्ती न करता वाढलेल्या पुरुषाचा ग्रास काळ करित असतो. भगवद्भक्ती पारंगत भगवद्भक्तांच्या पुढे काळ चळचळा कापत असतो. त्याच्या दृष्टीपुढे अज्ञान येऊच शकत नाही. ब्रह्मदेवादिक ज्या श्री गुरु निवृतीरायांना वंदन करतात. त्यांचा मी दास झालो असे माऊली सांगतात.
