सोवळा होऊ तो वोंवळे
2956.
सोवळा होऊ तो वोंवळे जडले । सांडीमांडी बोलतोंडी बीजी ॥१॥
एकसरी केली कलेवरे साटी । आता नका तुटी पायासवे ॥धृपद॥
संकल्पी विकल्प पापाचा सुकाळ । रज्जुसर्प मूळ मरणाचे ॥२॥
तुका म्हणे हे तू ब्रम्हांड चाळिता । मी का करू चिंता पांडुरंगा ॥३॥
अर्थ :
देवा मी शुध्द होण्यास गेलो तर अनेक विकार माझ्या अंगी जडले व मूळ बीज जे आहे ते सोडून विधिनिषिदच मात्र बोलत आहे. त्यामुळे देवा मी आता माझे शरीर तुम्हाला अर्पण केले आहे. तुमच्या चरणाजवळ मी आलो आहे आता तुमच्या चरणाचा वियोग तुमच्या पायाचा वियोग मात्र मला आता होऊ देऊ नका. संकल्पाच्या ठिकाणी जर विकल्प उत्पन्न झाला तर तो पापासाठी सुकाळच ठरतो. जसे रज्जूच्या ठिकाणी अज्ञानामुळे सर्पाचा भास होतो व तो मरणासाठी मूळ कारणही ठरतो. तुकाराम महाराज म्हणतात, हे पाडूरंगा संपूर्ण ब्रम्हांडाचा तू चालक आहेस त्यामुळे मी चिंता तरी कशासाठी करु ?
