आज्ञा पाळुनिया असे ए
2139.
आज्ञा पाळुनिया असे एकसरे । तुमची उत्तरे संतांची ही ॥१॥
भागवूनि देह ठेवियेला पायी । चरणावरी डोई येथुने चि ॥धृपद॥
येणे जाणे हे तो उपाधीचे मूळ । पूजा ते सकळ अकर्तव्य ॥२॥
तुका म्हणे असे चरणींचा रज । पदी च सहज जेथे तेथे ॥३॥
अर्थ :
हे संत जनहो तुम्ही मला जशी आज्ञा केली आहेत त्या प्रमाणे मी त्या आज्ञेचे पालन करून तसेच वागत आहे. सर्व प्रकारच्या भोगापासून माझा देह आता निवृत्त झाला आहे आता तुमच्या चरणावर हा देह मी अर्पण केला आहे आणि येथूनच तुमच्यावर चरणावर मी माझे डोके ठेवत आहे. खरे तर तुमची पूजा म्हणजे काहीच न करणे ही आहे आणि तुमच्याकडे येणे जाणे म्हणजे हे उपाधीचे मूळ आहे म्हणजे हे उपाधीमुळेच घडते. तुकाराम महाराज म्हणतात हे संत जनहो मी तर तुमच्या पायाची धूळ आहे तुमचे पावले जेथे जेथे उमटतील तेथे तेथे मी आत्म दृष्टीने सहजच असेल.
